तेरी मेरी यारी. . .राजूभाऊ आणि गुलाबभाऊंच्या मैत्रीची अनोखी दास्तान !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट (दत्तात्रय गुरव) | राजकारणात लोक वार्‍यासारखे दिशा बदलत असल्याचे मानले जाते. याचमुळे काळाच्या कसोटीवर टिकणारी मैत्री ही पुढार्‍यांमध्ये क्वचीत आढळून येते. मात्र याला काही अपवाद देखील आहेत. आज परलोकी गेलेले माजी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातील याराना हा याच दुर्मीळ प्रकारातील मानावा लागणार आहे. राजूभाऊंच्या निधनाने या जगावेगळ्या मैत्रीतील एक दुवा निखळला आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवीलाल दायमा यांचे आज देहावसान झाले. गेल्या काही वर्षांपासून ते विकारामुळे अंथरूणाला खिळून होते. आज त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना राजूभाऊंसारख्या निस्सीम शिवसैनिकाची अशी विकल अवस्था बघून त्यांचे जुने सहकारी आणि मित्र नेहमीच हळहळ व्यक्त करत असत. यातील एक सर्वात मोठे नाव म्हणजे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे होत ! या दोन्ही मान्यवरांमधील गेल्या सुमारे ३६ ते ३७ वर्षांमधील मैत्री राजकारणातील एक उजळ बाजू दाखविणारी ठरली आहे.

राजेंद्र देवीलाल दायमा आणि गुलाबराव रघुनाथ पाटील यांनी जवळपास एकाच कालखंडात मागे-पुढे म्हणजे १९८४-८५च्या सुमारास शिवसेनेत कारकिर्द सुरू केली. दायमाजी हे काही वर्षे आधी शिवसेनेत होते. यात वयाने आणि अधिकाराने मोठे असल्याने साहजीकच राजेंद्र दायमा यांचे राजूभाऊ झाले. संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मोठ्या भावाप्रमाणे त्यांची वागणूक असल्याने ते खूप लोकप्रिय होते. काही वर्षांमध्येच म्हणजे नव्वदचे दशक सुरू होतांना राजेंद्र दायमा यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची धुरा आली. याच कालखंडात जिल्ह्यातील दुसर्‍या भागात आपले अमोघ नेतृत्व आणि आक्रमकतेने छाप पाडणार्‍या गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व उदयमान झाले. त्यांच्यातील चमक पाहून राजेंद्र दायमा यांनी त्यांना पहिल्यांदा पंचायत समितीचे तिकिट गुलाबराव पाटील यांना दिले. यात त्यांनी बाजी मारली. यानंतर जिल्हा परिषद सदस्य, आमदारकी अशा पायर्‍या ते चढत गेले. या सर्व प्रवासात तेव्हा जिल्हाप्रमुख असणार्‍या राजेंद्र दायमा यांचे त्यांना आशीर्वाद लाभले. राजूभाऊ हे आपले मोठे बंधू असल्याची कृतज्ञता त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. ही कृतज्ञता त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे.

भुसावळच्या राजकारणातील एक अविस्मरणीय जोडी म्हणजे भाजप नेते बन्सीलाल चंपकलाल ( बी. सी. ) बियाणी उर्फ मामाजी आणि राजेंद्र देवीलाल दायमा उर्फ राजू भाऊ ! भाजप आणि शिवसेना युतीचे हे जिल्ह्यातील बिनीचे शिलेदार होते. आणि या दोघांशी गुलाबराव पाटील यांचे अतिशय हृदयस्थ संबंध होते. २०१३ साली मामाजींचे प्रदीर्घ आजाराने देहावसान झाले. यानंतर काही दिवसांमध्ये राजेंद्र दायमा हे देखील अर्धांगवायूच्या धक्क्याने अंथरूणाला खिळले. असे असूनही गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या सोबतचे नाते आणि मैत्री जोपासली. १५ ऑगस्ट हा राजूभाऊंचा वाढदिवस आधी भुसावळातील शिवसैनिक अतिशय जल्लोषात साजरा करत असत. यातील प्रत्येक वाढदिवसाला गुलाबराव पाटील यांची उपस्थिती असे. विशेष बाब म्हणजे राजूभाऊ अंथरूणाला खिळल्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीने उड्डाण घेतले. आधी राज्यमंत्री आणि नंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. अर्थात, राजकारणातील मोठी पदे मिळाली तरी प्रत्येक १५ ऑगस्टला ते आवर्जून राजूभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जात असत. राजूभाऊंच्या जाण्याने हा सिलसिला आता थांबणार आहे.

राजेंद्र दायमा आणि ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा शिवसेनेचे दोन अतिशय आक्रमक चेहरे होते. दोन वाघच, एक तापी खोर्‍यातला तर दुसरा गिरणा खोर्‍यातला ! या दोघांनी आपल्या पक्षासाठी भरभरून आणि अतिशय उत्कटपणे काम केले. शिवसैनिक जोडले, पक्ष वाढविला. खाचखळग्यांमधून वाटचाल केली. अनेक चढ-उतार पाहिले. मात्र या सर्व प्रवासात हे दोन्ही मान्यवर मैत्री विसरले नाहीत. अगदी काही महिन्यांपूर्वी ना. गुलाबराव पाटील यांचे पुत्र विक्रम यांच्या विवाह सोहळ्याला राजूभाऊ दायमा हे व्हिलचेअरवर बसून आले तेव्हा उपस्थितांना त्यांच्यातील घट्ट भावबंधाचे दर्शन घडले होते.

या संदर्भात आधी एका कार्यक्रमात बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी राजेंद्रजी दायमा यांच्याबाबत अतिशय ओथंबलेल्या शब्दांमध्ये भावना व्यक्त केल्या होत्या. राजकीय कारकिर्दीत ज्यांनी आपल्याला घडविले, त्यांना विसरणे म्हणजे आपल्या बापाला विसरण्यासारखे आहे. आपण हे कदापी करणे शक्य नसल्यानेच राजूभाऊ हे आपल्यासाठी वंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजूभाऊ अंथरूणाला खिळल्यानंतर त्यांचे चिरंजीव ऍड. निर्मल दायमा आणि त्यांच्या कुटुंबालाही ना. पाटील यांनी आपले मानून आवश्यक त्या माध्यमातून मदत केली.

आपल्याला अडचणीच्या काळात मदत करणार्‍या बियाणी कुटुंबासोबत राजूभाऊ दायमा यांच्याबाबतची कृतज्ञता ही राजकीय शिखरावर जाऊन देखील कायम राखणे हे खरोखर कठीण होय. ना. गुलाबराव पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता ते करून दाखविले आहे. आता यंदाच्या १५ ऑगस्टला शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राजूभाऊ नसतील. आता ते आठवणीतच उरले आहेत. तथापि, राजेंद्र दायमा आणि गुलाबराव पाटील यांच्यातील मैत्रीचा सुगंध हा राजकारणातील दुर्गंधीच्या अक्षय्य भांडारावर मात करणारा ठरल्याचे कुणाला विसरता येणार नाही. मैत्री असावी तर अशी ! याचे राजकारणातील उदाहरण यापेक्षा दुसरे कोणतेही असू शकणार नाही. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्रजी दायमा यांना लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे आदरांजी व्यक्त करतांना या मैत्रीसमोर आम्ही नतमस्तक होत आहोत.

Protected Content