केळीवरील कुकुंबर मोझॅक विषाणूपासून काळजी घ्या – जिल्हा कृषी अधीक्षक

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा केळी उत्पादनात अग्रेस्त असून सुमारे ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळी वाणाची लागवड केली जाते. दरवर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान केळी पिकावर आढळून येत असलेल्या कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भावा पासून काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

जून-जुलै दरम्यान सततचे ढगाळ वातावरण, वारंवार अखंडित पाऊस, प्रकाशाची तीव्रता कमी असण्यासह दमट आर्द्र हवामान, किमान तापमान २४-२५ अंश यामुळे केळी पिकावर कुकुंबर मोझॅक विषाणूचे आक्रमण होऊ शकते. केळीच्या कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे, पानाचा पृष्ठभागाची वाढ न होता पान कडक होणे, शिरांचा भाग काळपट पडून पाने फाटणे, पोग्याजवळीन पाने पिवळी होऊन पोंगा सडणे, झाडांची वाढ खुंटणे, इत्यादी लक्षणे असून प्रामुख्याने मावा किडींच्या माध्यमातून होतो.
या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिकांची फेरपालट करावी. केळी बागेतील आणि बांधावरील केणा, धोतरा, शेंदाड, गाजरे गवत आदी प्रकारचे गवत काढून बाग स्वच्छ ठेवावी. बागेत ४ ते ५ दिवसांनी २-३ वेळा निरीक्षण करून प्रादुर्भाव किंवा रोगग्रस्त झाडे जाळून नष्ट करावीत. केळी बागेत काकडी, भोपळा, कारली, दुधी भोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगे, मिरची, मका या आंतरपिकांची लागवड करू नये. तसेच केळी बागेभोवती रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत.
कुकुंबर मोझॅक विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३० ई.सी. २० मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्लू. जी. २ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ एस. एल. ५ मिली या किटकनाशकांची १० लीटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करावी, असेही आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Protected Content