चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अडावद गावातील पूजा ठाकूर यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत मिळवली असून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे ठाकूर समाजातील पहिली महिला डॉक्टर बनण्याचा मान त्यांनी मिळवला असून संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. पूजा ठाकूर यांनी सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एमबीबीएस शिक्षण पूर्ण करत प्रथम श्रेणीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाचा गौरव पदवीप्रदान समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. जंगम, महाविद्यालयाचे डीन आर. जयकर तसेच डेप्युटी डीन नरेश झांजड यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पूजा ठाकूर या अडावद येथील रहिवासी असून त्यांचे वडील विजय ठाकूर हे यावल तालुक्यातील दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत, तर आई निर्जला ठाकूर या जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबाच्या शैक्षणिक पार्श्वभूमी आणि पाठिंब्यामुळे त्यांनी हे यश संपादन केल्याचे सांगितले जात आहे.
पूजा ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण भागातून येऊन उच्च शिक्षणात यश मिळवणे हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेषतः मुलींनी शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे येऊन समाजात नवे आदर्श निर्माण करावेत, असा संदेश त्यांच्या यशातून दिला जात आहे.
या यशाबद्दल डॉ. पूजा ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाचे मित्रपरिवार, नातेवाईक तसेच अडावद आणि परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



