जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची वाढती अनुपस्थिती ही गंभीर सामाजिक आणि शैक्षणिक समस्या बनत असून या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), देवगिरी प्रदेशाच्या वतीने जळगावात महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. मराठवाडा आणि खान्देश स्तरावर करण्यात आलेल्या शास्त्रशुद्ध सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या घटत्या उपस्थितीमागील कारणांचा वेध घेत शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदलांची गरज अधोरेखित करण्यात आली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पार पडलेल्या या चर्चासत्रात शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी सहभाग नोंदवत विषयावर सखोल चर्चा केली. अभाविपचे राष्ट्रीय सहसंगठन मंत्री देवदत्त जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. अमोल मराठे, विभाग प्रमुख प्रा. डॉ. राहुल कुळकर्णी, प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितीन झाल्टे, अमोल नाना पाटील, अधिष्ठाता प्रा. जगदीश पाटील, प्रा. एस. एस. राजपूत यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चर्चासत्रात विद्यार्थ्यांच्या वाढत्या अनुपस्थितीच्या समस्येची विविध अंगांनी चिकित्सा करण्यात आली. कोविड-१९ नंतर उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लक्षणीय घट झाल्याने शैक्षणिक गुणवत्ता, मानसिक आरोग्य, सामाजिक सहभाग आणि कौशल्य विकासावर विपरीत परिणाम होत असल्याचे निरीक्षण मान्यवरांनी नोंदविले. विशेषतः ऑनलाइन शिक्षणानंतर वर्गातील प्रत्यक्ष उपस्थितीचे महत्त्व कमी झाल्याने नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
अभाविपने केलेल्या सर्वेक्षणात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापीठ प्रशासन अशा सहा प्रमुख घटकांचा सहभाग घेऊन व्यापक माहिती संकलन करण्यात आले. प्रश्नावली, प्रत्यक्ष संवाद आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून तयार करण्यात आलेल्या या अहवालात अनेक महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत.
अहवालानुसार सामाजिक आणि आर्थिक अडचणी, अध्यापनातील एकसुरीपणा, रोजगाराभिमुखतेचा अभाव, उपस्थिती नियमांतील शिथिलता, ऑनलाइन शिक्षणामुळे निर्माण झालेली मानसिकता, प्रवासाच्या अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांसारखी कारणे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमागे प्रमुख घटक असल्याचे स्पष्ट झाले. या समस्येकडे केवळ शिस्तीचा मुद्दा म्हणून न पाहता शिक्षण व्यवस्थेतील व्यापक बदलांच्या दृष्टीने पाहण्याची गरज चर्चासत्रातून व्यक्त करण्यात आली.
आधुनिक आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती, आयसीटीचा प्रभावी वापर, प्रयोगशील आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, तसेच कडक पण संवेदनशील उपस्थिती धोरणांची अंमलबजावणी या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात, असे मत अनेक तज्ज्ञांनी मांडले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आकर्षण वाढवण्यासाठी अभ्यासक्रमासोबत संवाद, मार्गदर्शन आणि कौशल्य विकासालाही प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित झाली.
अभाविपने या अहवालाच्या आधारे राज्यभर जनजागृती मोहीम, संवाद कार्यक्रम आणि विद्यार्थी विकासासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा कृती आराखडा तयार केला आहे. हा अहवाल महाराष्ट्र शासन तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर करण्यात येणार असून त्यातून धोरणात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न होणार आहे.
प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी यावेळी बोलताना शासन, विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी या समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहत ठोस कृती आराखडा राबविण्याची गरज व्यक्त केली. या प्रक्रियेत अभाविप सक्रिय सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.



