जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रावर असणार मूलभूत सुविधा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्या सोबतच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधेला तोंड द्यावे लागू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदान केंद्रांवर 15 प्रकारच्या विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी पार पडणार असलेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे व मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना कोणत्याही असुविधेला तोंड द्यावे लागू नये. याकरिता जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 15 प्रकारच्या विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना जिना चढावा लागू नये व सहज व सोप्या पद्धतीने मतदान करता यावे याकरिता मतदान केंद्र तळमजल्यावरच तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रात सहजरीत्या प्रवेश करता यावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प ची व्यवस्था देखील असणार आहे. मतदानाची प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडता यावी याकरिता मतदान केंद्रावर पुरेसे फर्निचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या असलेले उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मतदारांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया ही खुल्या व प्रकाशमान वातावरणात पार पडावी याकरिता मतदान केंद्रात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना मतदान प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती असावी याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेविषयी माहिती फलक देखील लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रात स्वच्छतागृहाची व्यवस्था देखील असणार आहे. सध्याचा कडाक्याचा उन्हाळा लक्षात घेता मतदान केंद्राच्या परिसरात सावली असावी यासाठी शेड किंवा मंडपाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या महिला मतदारांसोबत असलेल्या लहान बालकांना सांभाळण्यासाठी मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मतदानाविषयी काहीही अडचण उद्भवल्यास त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रावर मतदार सहाय्यता केंद्राची उभारणी देखील करण्यात येणार आहे. सध्याचा तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना उन्हामुळे काही त्रास निर्माण झाल्यास त्यांना तात्काळ प्रथमोपचार उपलब्ध व्हावा याकरिता प्रथमोपचाराची सुविधा देखील करण्यात येणार आहे. मतदान करताना किंवा मतदान केंद्रावर येत असताना वयस्कर तसेच महिला मतदार यांना कोणतीही अडचण उद्भवल्यास मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक देखील मतदान केंद्रावर असणार आहे. मतदानासाठी येत असलेल्या मतदारांना वाहतूक व्यवस्थेमुळे खोळंबून राहावे लागू नये किंवा वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होऊ नये याकरिता मतदान केंद्राच्या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात येणार आहे.मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदानासाठी असलेल्या रांगेत जास्त वेळ उभे रहावे लागू नये यासाठी मतदाना केंद्रांवर रांगेचे व्यवस्थापन करण्यावर देखील भर देण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधा देखील पुरवण्यात येणार असून त्यात मतदान केंद्रांवर आरोग्य पथक तैनात करण्यात येणार आहे. मतदारांना उन्हामुळे त्रास काही त्रास झालाच तर म्हणून आवश्यक औषधींची सुविधा देखील मतदान केंद्रांवर पुरवण्यात येणार आहे.

Protected Content