Breaking : कार-दुचाकीच्या भीषण अपघातात आशा सेविकेसह दोन बालक जागीच ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहराकडून पाचोराकडे जाणार्‍या चारचाकी कारने रामदेववाडीजवळ ईलेक्ट्रीक दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आशा सेविकेसह दोन बालके जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी ७ मे रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान ही घटना घडताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कारचालकांना माराहाण करून कारची तोडफोड केली. तसेच ग्रामस्थांनी रास्तारोको देखिल केला.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण (वय 26) ह्या आशासेविका म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास मुलगा सोहम (वय 7), सोहमेश (वय 4) आणि 16 वर्षीय भाचा असे चौघेजण ईलेक्ट्रीक दुचाकी क्र. एमएच 19-ईई- 8925 ने शिरसोलीकडे जात होते. यावेळी रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर जळगावकडून येत असलेल्या कार क्रमांक एमएच.19.सीव्ही.6767 ने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी अक्षरश: चक्काचूर झाली आणि चारचाकी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेचा कंपाऊंड तोडून आत शिरली. अपघातात दुचाकीवरील आशा सेविका राणी सरदार चव्हाण आणि दोन मुलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती कळताच सरदार चव्हाण आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. एका पोलीस पाटलाने धडक देणार्‍या तरुणांची बाजू घेतल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले.

कारची तोडफोड
संतप्त जमावाने दुचाकीला धडक देणार्‍या चारचाकीसह तरुणांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या चारचाकी क्रमांक एमएच.19.सीजे.1177 ची देखील तोडफोड केली. वातावरण अधिकच चिघळल्याने दगडफेक देखील झाली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह आरसीपी प्लाटून आणि पोलिसांचा मोठा ताफा पोहचला होता. रात्री 8.30 वा. तिघांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात रवाना करण्यात आला.

धडक देणारी मुले बड्या व्यक्तींची
दरम्यान, धडक देणार्‍या वाहनात गांजाच्या पुड्या आढळून आल्या असून दोन्ही कार एका बड्या व्यक्तीची असल्याचे समजते. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.

Protected Content