दारू पिण्यावरून हॉटेल मालकाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील आव्हाणे फाट्याजवळील रेस्टॉरंटमध्ये दारु पिणार्‍या वाळूमाफियांना मालकाने हटकले. त्याचा राग आल्याने सात ते आठ वाळू माफियांनी हॉटेलची तोडफोड करीत हॉटेलमालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी ४ डिसेंबर रेाजी सायंकाळी ५ वाजता घडली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल्याने ग्रामस्थ व वाळूमाफिया यांच्यात तुफान राडा झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहे. तर तिघ वाळूमाफियांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथेल किरण छगन पाटील (वय-३३) यांचे आव्हाणे फाट्याजवळ माऊली स्नॅक्स ऍन्ड कोल्ड्रींक्स नावाचे रेस्टॉरंट आहे. रविवारी ४ डिसेंबर रेाजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास याठिकाणी सात ते आठ वाळूमाफिये आले. त्यातील काही जण अगोदरच दारुच्या नशेत असल्याने त्यांनी रेस्ट्रॉरंटमध्ये दारु पिण्यास सुरुवात केली. हॉटेल मालक किरण पाटील यांनी त्यांना येथे फॅमिली नाश्ता करण्यासाठी येत असल्याचे सांगत तुम्ही याठिकाणी दारु पिवू नका असे म्हणत हटकले. त्याचा राग आल्याने वाळूमाफियांनी हॉटेल मालकाशी हुज्जत घालीत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मालकाला मारहाण होत असल्याचे दिसताच तेथे काम करणारे त्यांना वाचविण्यासाठी गेले. परंतु दारुच्या नशेत असलेल्या वाळूमाफियांकडून खुर्ची व विटा त्यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर दुखापत केली. या घटनेमध्ये रेस्ट्रॉरंट मालक किरण छगन पाटील रा. आव्हाणे व रविंद्र रमेश पाटील हे दोघ तरुण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरु आहे.

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाळूमाफियांना चोप देण्यास सुरुवात केल्याने चार वाळूमाफियांनी घटनास्थाळाहून पसार झाले. तर तिघांना ग्रामस्थांनी हॉटेलमध्येच डांबून ठेवले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डांबून ठेवलेल्या संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Protected Content