पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज पाचोर्यात कार्यक्रमानिमित्त आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.
आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील बडगुजर समाजाच्या महाअधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी आलेले आहेत. एमएम कॉलेजच्या प्रांगणातील हेलीपॅडवर त्यांचे आगमन झाल्यानंतर मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडने त्यांचा ताफा अडवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
मराठा समाजा बद्दल अपशब्द वापराणार्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला बडतर्फ करुन तात्काळ अटक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच सहा महिने झाले शिंदे – फडणवीस सरकार ने मराठा आरक्षणवरील मौन तोडुन मराठा समाजाला आरक्षण चा प्रश्न मार्गी लावावा. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षकच होते असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, निवेदन देतांना मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष जिभाऊ पाटील, पी. डी. भोसले, बाळु पाटील, संजय मुळे, मनोज पाटील, हेमंत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.