जळगाव प्रतिनिधी । दंतकथा या अब्दूल बिस्मिल्लाह लिखीत व भारत सासणे अनुवादीत साहित्यकृतीच्या वाचनाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित अभिवाचन महोत्सव आजपासून प्रारंभ झाला.
विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेच्या वतीने आयोजित परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सवाचे उदघाटन प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांच्या हस्ते झाले यावेळी मंचावर प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे, मंजूषा भिडे, होरलसिंग राजपूत, राहूल निंबाळकर हे उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा.माहूलीकर यांनी व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे महत्व अधिक असल्यामुळे तरुणांनी वाचनाकडे वळावे असे आवाहन केले. प्रा.मनोज पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. राजपूत यांनी परिवर्तनच्या उपक्रमांची माहिती दिली.
उदघाटनानंतर दंतकथा या साहित्यकृतीचे अभिवाचन करण्यात आले. यात हर्षल पाटील, हर्षदा पाटील, राहूल निंबाळकर, लिना तडवी-निंबाळकर, अक्षय नेहे, शितल पाटील या कलावंतांनी भाग घेतला. दिग्दर्शन हर्षल पाटील यांचे होते. नेपथ्य व पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी यांचे होते. या सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शहरी भागात आल्यानंतर कोंबडा रमत नाही माणसांचे वर्तन बघुन तो चकित होतो. वेगळ्या जगाची अनुभुती तो घेतो. असा आशय असलेल्या या कलाकृतीत राहूल आणि लिना निंबाळकर यांच्यातील प्रेम प्रसंगांच्या संवादांना विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या अभिवाचन महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. उद्या बुधवारी दुपारी ३.३० वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात अमृता, साहिर, इमरोज या कलाकृतीचे अभिवाचन होणार आहे.