भुसावळात महाआघाडीमध्ये बिघाडी; चौधरी समर्थकांच्या भूमिकेमुळे गोंधळ !

ncp congress

ncp congress

भुसावळ प्रतिनिधी । येथील महाआघाडीचे उमेदवार जगन सोनवणे एकाकी किल्ला लढवत असतांना संतोष चौधरी समर्थक राष्ट्रवादीचे पदाधिकारी मात्र दुसर्‍याच अपक्षाचा प्रचार करत असल्यामुळे महाआघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. या गोंधळाचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

भुसावळ मतदारसंघातून भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाच्या महायुतीतर्फे संजय सावकारे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे पहिल्यापासून निश्‍चीत असल्याने त्यांनी आधीच प्रचार सुरू केला होता. यासोबत पहिल्याद यादीत नाव आल्याने त्यांना पुरेसा वेळदेखील मिळाला. तर दुसरीकडे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पहिल्यांदा मनीष ट्रॅव्हल्सचे संचालक सतीश घुले यांना थेट राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष करून त्यांची उमेदवारी जाहीर केली. वास्तविक पाहता, राष्ट्रवादीतर्फे राज्यातील एकाही उमेदवाराचे नाव घोषीत नसतांना संतोष चौधरी यांनी अतिआत्मविश्‍वासात घुले यांच्या नावाची घोषणा केली. तथापि, पक्षाने ही जागा महाआघाडीतील सहकारी पक्ष असणार्‍या पीआरपीला सोडून त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. यानंतर चौधरींचा गट साहजीकच सतीश घुले यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता असतांना संतोष चौधरी यांनी अनपेक्षीतपणे डॉ. मधू मानवतकर यांना पाठींबा जाहीर केला. या बदलत्या घडामोडींमध्ये आमदार संजय सावकारे यांनी आपल्या प्रचारास प्रारंभदेखील केला. सध्या महाआघाडीतर्फे पीआरपीचे उमेदवार जगन सोनवणे हे एकहाती किल्ला लढवत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारीदेखील प्रचारासाठी फिरत असले तरी राष्ट्रवादीने मात्र संतोष चौधरींच्या निर्देशानुसार डॉ. मधू मानवतकर यांची साथ पकडल्याने महाआघाडीतील बिघाडी चर्चेचा विषय ठरली आहे.

सद्यस्थितीत संतोष चौधरी यांचे सर्व समर्थक हे डॉ. मधू मानवतकर यांच्या प्रचारात फिरत असले तरी खुद्द संतोष चौधरी यांचे जास्त लक्ष हे यावल-रावेर मतदारसंघाकडे लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे तेच लक्ष देत नसल्यामुळे त्यांच्या सहकार्‍यांमध्येही चलबिचल सुरू झाल्याचे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. यातच मानवतकर कुटुंब हे राजकारणात नवीन असल्याने त्यांना अनेक डावपेच माहित नसल्याचा फायदा चौधरी समर्थक पदाधिकारी घेत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सतीश घुले यांची क्षणात साथ सोडणारे संतोष चौधरी हे डॉ. मधू मानवतकर यांच्यासोबत शेवटपर्यंत ठामपणे उभे राहतील का ? ते घुले यांच्याप्रमाणे डॉ. मानवतकर यांनाही ऐन वेळेस वार्‍यावर सोडणार का ? याबाबतही खमंग चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे आमदार संजय सावकारे हे आपल्या सहकार्‍यांसह प्रचारात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. अर्थात, मतदार नेमका कुणाला कौल देणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

Protected Content