चिदंबरम यांच्या सुटकेचे सगळे मार्ग बंद

 

p.chidambaram

नवी दिल्ली प्रतिनिधी । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली असून सध्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. जामिनावर सुटका व्हावी म्हणून चिदंबरम यांनी आज सर्वोच्च न्यायालयात नवीन अर्ज दाखल केला. त्याची सुनावणी सुरू असतानाच दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून त्यांना धक्का बसला आहे. चिदंबरम यांना आधीच सीबीआयने अटक केली होती, तर आता अंमलबजावणी संचालनालयाला चिदंबरम यांना अटक करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. यामुळे त्यांच्या सुटकेचे सर्व मार्ग बंद झाले आहे.

चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी आज विशेष न्यायालयाकडून ईडीला देण्यात आली. ही चौकशी अर्ध्या तासापर्यंत चालू शकते. त्याशिवाय ईडीला गरज वाटल्यास ते चिदंबरम यांना अटक करू शकतात, असे न्यायालयाने नमूद केले. ही परवानगी मिळताच ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुढची पावले उचलली असून ते उद्या (दि.16) बुधवारी चिदंबरम यांच्या चौकशीसाठी तिहार कारागृहात जाणार आहेत.

चिदंबरम यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयने मला अपमानित करण्यासाठीच कारागृहात ठेवले आहे, असा आरोप या अर्जात करण्यात आला आहे. चिदंबरम यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी हा जामीन अर्ज केला आहे. न्या. आर. भानुमती यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. चिदंबरम वा त्यांच्या कुटुंबातील कुणा सदस्याने साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा व त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची कोणतीही बाब पुढे आलेली नाही. आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांनी पैशांची अफरातफर केल्याचा वा आर्थिक नुकसान केल्याचाही कोणताही आरोप नाही, असा दावा करत सिब्बल आणि सिंघवी यांनी चिदंबरम यांना जामीन मिळावा, अशी मागणी केली.

Protected Content