मुंबई-वृत्तसेवा । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC प्रक्रियेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले असून, अशा खोट्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. EKYC प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून लाभार्थींनी स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये काही व्यक्ती “EKYC करून देतो” असे सांगून महिलांची दिशाभूल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारांमुळे महिलांची आर्थिक आणि सामाजिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. मात्र EKYC प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया लाभार्थी महिला आपल्या मोबाईलवरून स्वतः सहज पूर्ण करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार EKYCच्या नावाखाली काही ठिकाणी महिलांशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, EKYC ही पूर्णतः मोफत आणि थेट सरकारी प्रणालीद्वारे केली जाणारी प्रक्रिया आहे. कोणत्याही एजंट, दलाल किंवा मध्यस्थाला पैसे देण्याची गरज नाही. अशा फसव्या प्रकारांपासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही प्रशासनाने अधोरेखित केले आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून, नागरिकांनी अधिकृत मार्गानेच EKYC पूर्ण करावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. महिलांनी जागरूक राहून अशा फसवणुकीच्या प्रकारांची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.



