अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील युवक शंतनू वाघमारे यांनी स्थानिक पातळीवरील प्रश्नांना जागतिक व्यासपीठ मिळवून देत ग्लोबल सिटिझन असेंब्ली (GCA) मध्ये प्रभावी सहभाग नोंदविला आहे. हवामान बदल आणि अन्न व्यवस्थेवरील या आंतरराष्ट्रीय चर्चेत त्यांनी अमळनेर व परिसरातील वास्तव जगासमोर मांडत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जानेवारी ते मार्च दरम्यान पार पडलेल्या या ग्लोबल सिटिझन असेंब्लीमध्ये जगभरातील नागरिक सहभागी होऊन हवामान बदलाचे परिणाम आणि अन्न व्यवस्थेतील आव्हानांवर चर्चा करतात. या व्यासपीठावर शंतनू वाघमारे यांनी केवळ प्रतिनिधित्वच केले नाही, तर स्थानिक स्तरावरील अनुभव प्रभावीपणे मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या प्रवासात आधार संस्था (Aadhar Sanstha) यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून त्यांनी आवश्यक कागदपत्रे, समन्वय आणि स्थानिक माहिती पुरवून शंतनूंना सक्षम पाठबळ दिले.

अमळनेर आणि परिसरातील गावांमध्ये हवामान बदलाचे जाणवणारे परिणाम जसे की वाढती उष्णता, ऋतूंच्या पद्धतीत होणारे बदल, शेतीवरील परिणाम यांचा सखोल आढावा शंतनूंनी जागतिक स्तरावर मांडला. त्यांनी केवळ भाषांतराची भूमिका निभावली नाही, तर स्थानिक नागरिकांच्या भावना आणि अनुभव अचूकपणे समजावून सांगत त्यांना योग्य न्याय मिळवून दिला.
या सत्रांमध्ये स्थानिक रिक्षाचालक किशोर पाटील यांनीही आपल्या अनुभवांची मांडणी केली. शंतनूंनी त्यांच्या विचारांना प्रभावीपणे जागतिक व्यासपीठावर पोहोचवले, ज्यामुळे सामान्य नागरिकांचाही आवाज या चर्चेत समाविष्ट झाला. “किशोरसारख्या लोकांचे आवाज जगापर्यंत पोहोचले पाहिजेत. हवामान बदलाचा परिणाम केवळ आकड्यांमध्ये किंवा अहवालांमध्ये दिसत नाही, तो प्रत्यक्ष आयुष्यात कसा जाणवतो हे समजणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे शंतनू यांनी सांगितले.
या चर्चांमध्ये हवामान बदल आणि अन्न व्यवस्था यांच्यातील संबंधावरही सखोल चर्चा झाली. शेती, उत्पादन आणि रोजच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत विविध देशांतील अनुभवांची देवाणघेवाण झाली. “आम्ही मोठ्या शब्दांत बोलत नाही, पण बदल स्पष्टपणे जाणवतो. ऋतू बदलले आहेत, उष्णता वाढली आहे आणि त्याचा आमच्या कामावर थेट परिणाम होत आहे,” असे किशोर पाटील यांनी सांगितले.



