मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील संताजी नगर परिसरात पावसाचे पाणी घरात शिरून मालमत्तेचे नुकसान होत असतानाही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप एका नागरिकाने केला आहे. याप्रकरणी यापूर्वी तक्रार अर्ज देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संबंधित नागरिकाने मुख्याधिकाऱ्यांना अंतिम स्मरणपत्र देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारदार वासुदेव सिताराम काठोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, संताजी नगर परिसरातील शेजारील घरावरील पाण्याची टाकी भरल्यानंतर तसेच पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा न केल्यामुळे ते थेट त्यांच्या घराच्या आवारात साचत आहे. त्यामुळे घराच्या भिंतींना तडे जाण्याची भीती निर्माण झाली असून सातत्याने पाणी साचल्यामुळे मालमत्तेचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तक्रारदाराने १ जुलै २०२६ रोजी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा किंवा संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी आपल्या अंतिम स्मरणपत्रात केला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

स्मरणपत्रात महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, १९६५ चा उल्लेख करत सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि उपद्रव दूर करणे ही नगरपंचायतीची कायदेशीर जबाबदारी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. नागरिकांच्या लेखी तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तक्रारदाराने आपल्या अंतिम स्मरणपत्रात प्रशासनाकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये तात्काळ स्थळ पाहणी करणे, संबंधित घरमालकास नोटीस बजावणे, घरात येणारे पाणी त्वरित थांबविण्याचे आदेश देणे, नियमांनुसार संबंधितांवर कारवाई करणे तसेच यापूर्वी दिलेल्या तक्रारीवर झालेल्या अथवा न झालेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, योग्य वेळी कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी (जिल्हा प्रशासन), लोकायुक्त तसेच आवश्यक असल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही स्मरणपत्राद्वारे देण्यात आला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणावर नगरपंचायतीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तक्रारदाराने केलेल्या आरोपांबाबत संबंधित प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते आणि पुढे कोणती कार्यवाही केली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



