मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आल्याचा दावा असलेल्या आक्षेपार्ह आणि मानहानीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
भाजपच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार येथील विजय चौधरी नावाच्या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी कथितरीत्या अश्लील, अवमानकारक आणि बदनामीकारक भाषा वापरल्याचा आरोप आहे. अशा प्रकारचे वक्तव्य हे केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनात कार्यरत महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे असून समाजात चुकीचा संदेश पोहोचवणारे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोर्चादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील लाखो नागरिकांच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित अशोभनीय वक्तव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या असून अशा समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

या आंदोलनात भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, भाजपा जिल्हा सदस्य चंद्रकांत भोलाणे, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख ललिता महाजन, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेविका माधुरी सचिन पाटील, नगरसेविका साधना बापू ससाणे, नगरसेवक नईम बागवान, वैशाली मनोज जाधव, शितल लक्ष्मण सापधरे, इंद्रायणी प्रकाश भोई, अनुराधा योगेश चौधरी, सालबर्डीच्या माजी सरपंच तृप्ती तुषार राणे, स्वाती पंकज भारंबे, कोथळीचे सरपंच नारायण चौधरी, प्रशांत महाजन, बापू ससाणे, लक्ष्मण सापधरे, बाळा चिंचोले, कैलास वंजारी, दत्ता जोगी, माजी सरचिटणीस अंकुश चौधरी, पंकज पाटील, पंकज सरोदे, मयूर महाजन, जुबेर अली, अनिस पटेल, विनायक पाटील, प्रशांत जंगले, उमेश राणे, योगेश चौधरी, ललित खडसे, जानकीराम पांडे, सुनिल श्रीखंडे, सोमनाथ पाटील, योगेश मनसुटे, सार्थक पाटील, जयेश कारले, लखीचंद जैन यांच्यासह भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याचे पदाधिकारी, विविध आघाडी-सेलचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



