मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्य सरकारने लघुलेखक (स्टेनोग्राफर) हे पद ‘मृत’ घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला पूर्णविराम दिल्याने राज्यभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयावर विविध स्तरांतून टीका होत असून, हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्टेनोग्राफर पदाच्या भरतीवरच सरकारने गंडांतर आणल्याने अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफीचे प्रशिक्षण घेत होते. मात्र अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे स्वप्न अक्षरशः भंगले आहे.
विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध करत, “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही या पदासाठी तयारी करत आहोत. आता अचानक पदच रद्द केल्याने आमचे करिअर अडचणीत आले आहे,” अशी भावना व्यक्त केली. एकीकडे भरती प्रक्रिया राबवली जात नाही आणि दुसरीकडे उपलब्ध पदेही बंद केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार Supriya Sule यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त करत सरकारला धारेवर धरले आहे. “स्टेनोग्राफीचे कोर्स करून वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या तरुणांची ही मोठी निराशा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे पद महत्त्वाचे होते. शासनाने त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत,” असे त्या म्हणाल्या.
पुढे त्यांनी शासनाला आवाहन करत, “हे पद पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यामध्ये नव्या कौशल्यांची भर घालून ते सुरू ठेवण्याचा पर्याय तपासावा. तरुणांच्या नोकरीच्या संधी अशा पद्धतीने हिरावून घेणे योग्य नाही,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.
दरम्यान, या निर्णयामुळे स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतलेल्या हजारो उमेदवारांचे भविष्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात असून, सरकारने लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.



