पुणे -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उच्च शिक्षण क्षेत्रात वाढते खाजगीकरण, व्यापारीकरण, बेरोजगारी, सामाजिक असमानता तसेच लोकशाही अवकाशांचे संकुचन या गंभीर प्रश्नांवर सखोल चिंतन करण्यासाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटना, पुणे यांच्या वतीने एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील विद्यमान आव्हानांवर अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या चर्चासत्रात शिक्षणातील जात, वर्ग आणि लिंगभेद, नवीन शैक्षणिक धोरण (NEP), विद्यार्थी चळवळींचे भवितव्य तसेच सामाजिक न्यायाशी निगडित विविध मुद्द्यांवर तज्ज्ञ, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. समान, न्याय्य आणि लोकशाहीवादी शिक्षण व्यवस्थेच्या निर्मितीसाठी विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

हे चर्चासत्र रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत राष्टसेवा दल, सिंहगड रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकशाहीर संभाजी भगत यांच्या उपस्थितीत होणार असून त्यांच्या विचारप्रवर्तक मार्गदर्शनाने चर्चासत्राला दिशा मिळणार आहे.
उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भातील चिंता यावर व्यापक पातळीवर चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांनी या चर्चासत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



