मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आयआयटी मुंबई ही देशातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ घडविणारी महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था असून, जनहिताच्या संशोधनाला संस्थेत सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. आयआयटी मुंबईच्या वातावरणात जातीयवादाला कोणताही थारा नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन संस्थेचे संचालक डॉ. शिरीष केदारे यांनी केले. छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने आयआयटी मुंबईला भेट देऊन डॉ. केदारे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
समाजमाध्यमांवर आयआयटी मुंबईच्या संदर्भात विविध प्रकारच्या चर्चा सुरू असताना संस्थेतील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने आयआयटी परिसराला भेट दिली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने काही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना आणि अनुभव जाणून घेतले. त्यानंतर संस्थेचे संचालक डॉ. शिरीष केदारे यांच्याशी शैक्षणिक वातावरण, संशोधन, विद्यार्थी जीवन तसेच सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान भावी संशोधक साहिल वाकोडे याची आत्महत्या ही त्याच्या कुटुंबीयांसह संपूर्ण आयआयटी परिवारासाठी अत्यंत दुःखदायक घटना असल्याची भावना डॉ. केदारे यांनी व्यक्त केली. अशा घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळणे, त्यांचा आत्मविश्वास वाढणे आणि त्यांना आवश्यक ते भावनिक पाठबळ मिळणे या बाबींवरही चर्चा झाली. छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे, महासचिव ज्ञानदीप पाटील आणि मुख्य संयोजक चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने आयआयटी मुंबईतील शैक्षणिक आणि संशोधनविषयक वातावरणाची माहिती घेतली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून संस्थेतील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला.

आयआयटी मुंबईने देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. विविध जनहिताच्या संशोधनांमुळे संस्थेने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘CAR-T’ पद्धतीपासून ‘ध्रुव’ या स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी चिपपर्यंत विविध महत्त्वपूर्ण संशोधनांमध्ये आयआयटी मुंबईचा सहभाग राहिला आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात २६ टक्क्यांपेक्षा अधिक वीजनिर्मिती क्षमता असलेल्या सौर ऊर्जा पेशी, हरित हायड्रोजन निर्मितीसाठी नवीन उत्प्रेरकांचे संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर तसेच ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये आयआयटी मुंबईचे योगदान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या संस्थेतील गुणवंत प्राध्यापक तसेच कठोर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याचे छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने सांगितले. विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आत्मिक बळ मिळावे, तसेच संस्थेतील सकारात्मक वातावरण अधिक मजबूत व्हावे, अशी विनंती शिष्टमंडळाने डॉ. शिरीष केदारे यांना दिलेल्या निवेदनातून केली. आयआयटी मुंबईसारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या कार्याकडे केवळ वादांच्या दृष्टिकोनातून न पाहता, संस्थेचे संशोधन, विद्यार्थ्यांचे योगदान आणि देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील भूमिका यांचाही व्यापक विचार होणे आवश्यक असल्याची भूमिका शिष्टमंडळाने मांडली. संस्थेच्या राष्ट्रीय योगदानाची दखल घेत विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आणि विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करण्यावर भर देण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.



