जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुरक्षा नगर परिसरात नागरिकांकडून वारंवार होत असलेल्या पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या तक्रारींची दखल घेत उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
सुरक्षा नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नियमित आणि वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याच्या तसेच पाणी आल्यानंतर पुरेसा वेळ उपलब्ध न करून दिल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात होत्या. तसेच स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटींमुळे परिसरात अस्वच्छतेचे प्रश्नही गंभीर बनले होते. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी परिसराला भेट देत प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी महापालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच आरोग्य निरीक्षकांना तत्काळ घटनास्थळी बोलावून घेत परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांनी वॉलमन वेळेवर ऐकत नसल्याच्या तसेच पाणीपुरवठा नियोजनात अनियमितता असल्याच्या तक्रारी मांडल्या. तसेच गटर सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे परिसरातील दैनंदिन स्वच्छतेवर परिणाम होत असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.

या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत उपमहापौर मनोज चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून त्यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठा वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याचे, तसेच स्वच्छता व्यवस्थेत शिस्त आणण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी नियमित देखरेख ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले.



