जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश देणारा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्विमिंग पूलमध्ये सर्व स्विमर्ससोबत सहभागी होत योगसाधना केली. खेळाडू, प्रशिक्षक आणि नियमित पोहणाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
योग आणि जलक्रीडा यांचा सुंदर संगम साधत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या स्विमर्सनी विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव केला. शरीराची लवचिकता, मानसिक एकाग्रता आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. याप्रसंगी एकलव्य क्रीडा संकुलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण एच. बेलूरकर, पूल मॅनेजर अंकुश चौधरी, स्विमिंग कोच नवीन पाटील, पंकज बाविस्कर, अमोल गोमटे, चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. तसेच महिला स्विमिंग कोच श्रीमती संगीता चौधरी, कोमल पाटील, निराशा सोनवणे यांच्यासह नियमितपणे स्विमिंग करणाऱ्या सर्व स्विमर्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देत नियमित व्यायाम, योगसाधना आणि खेळ यांचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व सांगितले. योगामुळे शरीर आणि मन यांच्यात संतुलन निर्माण होते तसेच खेळाडूंना शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी त्याचा मोठा फायदा होतो, असे त्यांनी नमूद केले.

एकलव्य क्रीडा संकुलातील स्विमर्सनी योगासनांसोबत प्राणायाम आणि ध्यानधारणेत सहभाग घेतला. पोहणे आणि योग या दोन्ही माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमामुळे क्रीडा संकुलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.



