Home क्रीडा “सौरभ स्मृती चषक २०२६” टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत महाराणा केकेआर संघ विजेता

“सौरभ स्मृती चषक २०२६” टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत महाराणा केकेआर संघ विजेता


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरलेली “सौरभ स्मृती चषक २०२६” अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. द्वारकाई खडके मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील विविध संघांनी सहभाग नोंदवत दमदार खेळाचे प्रदर्शन केले.

दि. ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. स्पर्धेचा अंतिम सामना छत्रपती वॉरियर जळगाव आणि महाराणा केकेआर, छत्रपती संभाजीनगर या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगला. प्रथम फलंदाजी करताना छत्रपती वॉरियर जळगाव संघाने ६ षटकांत ३ बाद ३४ धावा केल्या. आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना महाराणा केकेआर संघाने ५.४ षटकांत २ बाद ३५ धावा करत थरारक विजय मिळवून चषकावर आपले नाव कोरले.

स्पर्धेतील विजेत्या महाराणा केकेआर संघाला रोख रक्कम रुपये २ लाख आणि आकर्षक चषक प्रदान करण्यात आला, तर उपविजेत्या छत्रपती वॉरियर जळगाव संघाला रुपये १ लाख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांकासाठी नानाभाऊ सोनवणे युवा मंच, जळगाव संघाला रुपये ५१ हजार आणि चषक देण्यात आला.

वैयक्तिक कामगिरीतही खेळाडूंनी आपली छाप सोडली. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सागर चौधरी यांना रुपये ११ हजारांचे पारितोषिक देण्यात आले, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जयदीप यांना रुपये ११ हजार देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून क्रांतिकुमार राठोड यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अक्षय जाधव यांना इलेक्ट्रिक स्कूटर आणि चषक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

स्पर्धेच्या समारोप प्रसंगी विनोदभाऊ सोनवणे, नगरसेवक निलेश तायडे, प्रशिक्षक किशोर चौधरी, रणजी खेळाडू शशांक उत्तरदे (मुंबई संघ), नानासाहेब सोनवणे, सुनील (बंटी) भारदे, सागरभाऊ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच हर्षल खडके, दीक्षा खडके, हर्षिता खडके, गुंजन खडके, सौरभ पाटील, चंदन उत्तरदे, विजय महाजन आदींचीही उपस्थिती लाभली.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी द्वारकाई स्पोर्ट्स फाउंडेशन, आयोजक मंडळ, खेळाडू आणि ग्राउंड्समन यांनी घेतलेल्या परिश्रमांची सर्व स्तरातून दखल घेतली जात आहे. उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापनामुळे स्पर्धा सुरळीतपणे पार पडली.

 


Protected Content

Play sound