Home क्रीडा जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या 

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या 

0
2

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा, कथकच्या मनमोहक लयतालांचा आविष्कार आणि भगवान विष्णूंच्या नऊ अवतारांची कलात्मक अनुभूती जळगावकर रसिकांना घेता येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि कलादर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘अवतारम्’ या विशेष कथक नृत्यसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता एम. जे. कॉलेज परिसरातील कालिदास सभागृहात हा शास्त्रीय नृत्याचा सोहळा रंगणार आहे.

या कार्यक्रमात जळगावातील प्रख्यात नृत्यांगना डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार आणि त्यांच्या शिष्या कथक नृत्याच्या माध्यमातून ‘अवतारम्’ ही संकल्पना सादर करणार आहेत. भगवान विष्णू यांच्या विविध रूपांतील नऊ अवतारांवर आधारित या नृत्यरचनेतून पौराणिक आशय आणि भारतीय शास्त्रीय नृत्यशैली यांचा सुरेख संगम रसिकांसमोर उलगडणार आहे. कथक नृत्यातील पदन्यास, तालबद्ध हालचाली, भावमुद्रा आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रत्येक अवताराचे वैशिष्ट्य रंगमंचावर साकारले जाणार आहे. नृत्य, संगीत आणि भाव यांचा समन्वय साधणाऱ्या या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीतील पौराणिक परंपरेचा कलात्मक परिचय रसिकांना मिळणार आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्यप्रेमींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड असलेल्या जळगावकरांसाठी ही नृत्यसंध्या विशेष आकर्षण ठरणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि कलादर्पण यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. शास्त्रीय नृत्यकलेला प्रोत्साहन मिळावे आणि अधिकाधिक रसिकांपर्यंत ही कला पोहोचावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या नृत्यसंध्येला जळगावातील सर्व रसिक प्रेक्षक, कलावंत, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि नृत्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष ॲड. संजय राणे तसेच कलादर्पणचे उपाध्यक्ष पद्मनाभन अय्यंगार यांनी केले आहे.


Protected Content

Play sound