दुकानांपासून टपऱ्यांपर्यंत सहज उपलब्धता, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह!
वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव शहरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी सुपारीची विक्री पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा आणि सुगंधी सुपारीजन्य पदार्थ शहरातील विविध दुकानांमध्ये तसेच पानटपऱ्यांवर सर्रास उपलब्ध होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

विशेष म्हणजे, बंदी असलेला गुटखा मध्यप्रदेशातून वरणगावात आणला जात असल्याचा आरोपही केला जात आहे. शहरात गुटख्याचे कंटेनर च्या कंटेनर खाली होत असल्याची चर्चा असून, या संपूर्ण व्यवहारामागे नेमका कोण आहे? वरणगावात गुटख्याचा मोठा डीलर कोण? आणि या अवैध व्यवसायाला कोणाचे अभय आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही वरणगाव शहरात या पदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र समोर येत असल्याचा नागरिकांचा दावा आहे. शहरातील अनेक किराणा दुकाने, पानटपऱ्या आणि इतर विक्री केंद्रांवर प्रतिबंधित पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून प्रतिबंधित गुटखा वरणगावात आणला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या पुरवठा साखळीमागे नेमके कोण आहे, माल कुठून येतो आणि शहरात त्याचे वितरण कोण करतो, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. एकीकडे शासनाकडून गुटखाबंदीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले जातात, तर दुसरीकडे वरणगावात प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मग अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नेमके करतात तरी काय? शहरात तपासणी होते का? प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आणि त्याच्या पुरवठादारांवर कारवाई कधी होणार? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
वरणगावातील प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीची तातडीने चौकशी करण्यात यावी. मध्यप्रदेशातून होणाऱ्या कथित पुरवठ्याचा शोध घ्यावा. शहरातील दुकाने आणि पानटपऱ्यांची तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



