नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने नशिराबाद नगरपरिषदेने एक महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य पाऊल उचलले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या द्रोण, पत्रावळी व प्लेट्सचा वाढता वापर टाळण्यासाठी नगरपरिषदेतर्फे लवकरच ‘बर्तन बँक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या पर्यावरणपूरक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, सभेपुढील सर्व दहा विषयांना सर्वसम्मतीने मंजुरी देण्यात आली आहे.
शहरात आयोजित होणारे लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि थर्माकोलच्या प्लेट्स, द्रोण व ग्लासचा वापर केला जातो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होतो. या समस्येवर प्रभावी पर्याय म्हणून नगरपरिषद ‘बर्तन बँक’ चालवणार असून, याद्वारे नागरिकांना अत्यंत अल्प किंवा डिपॉझिट स्वरूपात स्टीलच्या प्लेट्स, वाट्या, ग्लास आणि इतर आवश्यक भांडी उपलब्ध करून दिली जातील. कार्यक्रम संपल्यानंतर ही भांडी स्वच्छ धुऊन पुन्हा नगरपरिषदेकडे जमा करावी लागतील, ज्यामुळे प्लास्टिकचा वापर थांबण्यास मोठी मदत होईल.

या सर्वसाधारण सभेत केवळ पर्यावरणच नव्हे, तर आरोग्याशी संबंधित एका अत्यंत संवेदनशील विषयालाही मंजुरी मिळाली. शहरातील वैद्यकीयदृष्ट्या गरजू असलेल्या रुग्णांना घरच्या घरी उपचार घेण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी मेडिकल बेडची गरज भासल्यास, तो नगरपरिषदेमार्फत विनामोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून उपचारादरम्यानची त्यांची एक मोठी अडचण दूर होणार आहे.
याशिवाय, महिला व बालकल्याण समितीच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांसाठीच्या खर्चास सभेत मान्यता देण्यात आली. तसेच नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या अर्जांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना सणअग्रिम आणि बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय बैठकीत जिल्हा वार्षिक योजना निधी २०२६-२७ अंतर्गत विविध विकासकामे सुचविणे, नगरपरिषदेच्या कायदेशीर बाबींसाठी वकिलांचे पॅनल नियुक्त करणे, कार्यालयीन दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन फर्निचर खरेदी करणे आणि विद्युत विभागाच्या तातडीच्या कामांसाठी वार्षिक कंत्राटदार नेमणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.



