महासभेत तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्यांंवर लाच घेल्याचा आरोप

IMG 9588

जळगाव, प्रतिनिधी | शहराचा स्वच्छतेचा मक्ता नाशिक येथील वाटर ग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. ही कंपनी शहरात साफसफाई ठेवण्यात कमी पडत असतांना मनपा अधिकारी कंपनीला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी महासभेत केला. महापौर सिमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी महासभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

विधानसभेच्या आचारसंहिते नंतरच प्रथमच घेण्यात आलेली महासभा ही स्वच्छतेच्या माक्त्यावरून गाजली. यात भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी वॉटर ग्रेसच्या मक्तेदाराकडून अधिकारी मलिदाखात असल्यामुळे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला. नगरसेवक चेतन सनकत, प्रशांत नाईक यांनी तत्कालीन आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यावर वाटर ग्रेस कंपनीला काम मिळावे यासाठी ५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला. बिग बाजारच्या रस्त्यावर पाटील यांनी वॉटरग्रेसच्या खामगाव येथील प्रतिनिधी अक्रम यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले. त्याचे पुरावे नगरसेवकांकडे असल्याचेही नाईक यांनी सांगितले. तसेच याबाबत उपायुक्त दंडवते यांना माहिती देण्यात आली होती अशी पुष्टी देखील सनकत यांनी जोडली. शिवसेनेचे नगरसेवक इब्राहीम पटेल, प्रशांत नाईक व एमआयएमचे सदस्य रियाज बागवान यांनी प्रभागांमध्ये साफसफाई होत नसल्याचा विषय पत्रिकेवरील विषय संपताच उपस्थित केला. यावेळी भाजप नगरसेवक यांनी कोणताही प्रतिसाद त्यांना दिला नाही. यावर प्रशांत नाईक यांनी शहरात चांगली साफसफाई होत असल्यामुळे भाजप नगरसेवक समाधानी आहेत. अशी उपरोधिक टीका भाजपा सदस्यांवर केली. याकारणामुळे भाजप-सेना नगरसेवकांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. दरम्यान, स्थायी सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी वॉटरग्रेस कंपनीच्या मक्तेदारास दीड कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र तो दंड कमी होवून २८ लाखांवर कसा आला असा प्रश्न उपस्थित केला. याबाबत मनपा अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची बाजू अॅड. शुचिता हाडा यांनी सभागृहात मांडली. यापुढे साफसफाईच्या कामाबाबत नगरसेवकांचे अभिप्राय घ्यावे, तरच पुढील बिले अदा करण्यात यावे, अशी सुचनाही हाडा यांनी मांडली. दरम्यान, मनपा प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून बिले काढण्यात आली आहेत. त्यातच आमदार, महापौर, उपमहापौर यांनी मक्तेदाराचे बिले अदा करु नये असे सुचित केले असतांनाही बिले अदा करण्यात आल्यावरुन सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सभेच्या कामकाजात उज्वला बेंडाळे, सचिन पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील, धीरज सोनवणे, गायत्री शिंदे आदी नगरसेवकांनी सहभाग घेवून अधिकाऱ्यांव ताशेरे ओढले.

IMG 9592

कारवाई टाळण्यासाठी भाजप घेते पैसे :विरोधकांचा आरोप 
महासभेतील विषय पत्रिकेत तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे विषय घेण्यात आले होते. परंतु, हे विषय अमान्य करण्यात यावे व संबधित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घ्यावे, अशी बाजू अॅड. शुचिता हाडा यांनी मांडली. यावर कैलास सोनवणे यांनी देखील कर्मचाऱ्यांस शिक्षा करा मात्र, बडतर्फची कारवाई करु नये, असे मत मांडले. यावरून सेनेचे नगरसेवक इब्राहीम पटेल यांनी सत्ताधारी नगरसेवक कारवाई टाळण्यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप केला. यामुळे भाजपा गोटात एकच खळबळ उडाली. त्यांनी पटेल यांच्या आरोपाला जोरदार प्रतिउत्तर दिल्याने सेना भाजप नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली होती. शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी साफसफाईच्या मक्त्यात भाजपचे सात नगरसेवकांचा सहभाग आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. परंतु हा आरोप साफ खोटा आहे. जर सात नगरसेकांचा सहभाग आहेत, तर बरडे यांनी त्यांची नावे जाहीर करावी, असे आव्हान कैलास सोनवणे यांनी दिले. दरम्यान, बरडे हे सभा अर्धवट सोडून गेले असता बरडे यांच्याकडे नावे नाहीत, आणि आम्ही जाब विचारणार म्हणून त्यांनी सभेतून पळ काढला असेही सोनवणे म्हणाले. त्यावर सेनेचे बंटी जोशी यांनी सांगितले की, ते महत्वाचे काम असल्यामुळे गेले आहे. पुढील सभेत नक्की नावे सभेसमोर सांगण्यात येतील ग्वाही जोशी यांनी दिली.

Protected Content