“त्या” प्रकरणानंतर आता जिल्हाधिकारी देखील रडारवर..; पडळकरांची थेट फडणवीसांकडे तक्रार!

मुंबई -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमारामुळे तत्कालिन पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांचा मुद्दा अजूनही तापला असतानाच आता जालना जिल्हाधिकारी सुद्धा रडारवर आले आहेत. जालन्याचे जिल्हाधिकारी कृष्णनाथ पांचाळ यांच्याविरोधात भाजप आ. गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता तत्कालिन एसपींची बदली चर्चेचा विषय झाला असतानाच आता जिल्हाधिकारी सुद्धा धनगर आरक्षणामुळे रडाररवर आले आहेत.

आंदोलने शांततेच्या मार्गानेच व्हावी ही धनगर समाजाची भूमिका आहे. परंतु, धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत जर काही अधिकारी हेतुपुरस्पर असंवेदनशीलपणे वागत आहेत. यातून धनगर समाजाला चिथावून पुन्हा राज्य अस्थिर करण्याचे काही अधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच आंदोलनातल्या 36 समाजबांधवांवरील दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचे आपण तात्काळ आदेश द्यावे, अशीही विनंती पडळकर यांनी केली आहे.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सरकारला दिलेला अल्टीमेटम संपल्यानंतर धनगर आरक्षण प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही राज्यभर २१ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक तहसिलदार, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आरक्षण अंमलबजावणीसाठीसाठी निवेदने दिली. संपूर्ण राज्यात शांततेत हा उपक्रम पार पडला. जालना जिल्हाधिकारी पांचाळ यांना निवदेन देण्यापूर्वी एक दिवस आधी माहिती देण्यात आली होती. त्यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारीही दर्शवली. मात्र, ऐनवेळी त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे हा विषय हाताळणे गरजेचे असतांना मात्र त्यांनी समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले म्हणूनच आम्हा धनगर योद्ध्यांच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. यासाठी सर्वस्वीपणे जालन्याचे जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई केली जावी. गोपीचंद पडळकर यांनी गुन्हे दाखल करण्यावरून निषेध केला आहे.

Protected Content