Birthday Special अशोकभाऊ जैन : प्रेरणादायी अष्टसूत्री

0


जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचा आज वाढदिवस. जळगावचे नाव जागतिक नकाशावर ठसविण्यात मोलाचा वाटा असणार्‍या या उद्योग समूहाची धुरा समर्थपणे सांभाळणार्‍या भाऊंच्या व्यक्तीमत्वातील अतिशय प्रेरणादायी अशा आठ पैलूंचा लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने घेतलेला हा आढावा

१) …घेतला वसा टाकू नका !– दिवंगत मोठेभाऊ भवरलालजी जैन यांनी एका मोठ्या उद्योग समूहाची पायाभरणी करून याला भरभराटीस आणले. वैयक्तीक व व्यावसायिक पातळीवर देदीप्यमान वारसा त्यांनी अशोकभाऊंसह आपल्या पुढील पिढीकडे हस्तांतरीत केला. खरं तर, वारसा हा अनेकांना मिळत असतो. तथापि, यासोबत मिळालेला वसा कायम राखण्याचे काम फार थोडे करतात. याच मोजक्या मान्यवरांमध्ये अशोकभाऊ जैन यांचा समावेश होतो. व्यवसायात यश संपादन करतांना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो याची जाणीव ठेवण्याचा हा वसा अशोकभाऊंनी सांभाळलाच नाही तर याला नवीन आयामदेखील दिला. जीवनात प्रोफेशनसोबत मिशनदेखील असावे असा संदेश यातून आपल्याला मिळतो.

२) वटवृक्षाखालील वटवृक्ष– कोणत्याही वटवृक्षाखाली दुसरा वटवृक्ष बहरू शकत नसल्याचे म्हणले जाते. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर असल्यामुळे या उक्तीमध्ये सत्यांशदेखील आहे. तथापि, जैन उद्योग समूहातील दोन पिढ्यांनी याला खोटे ठरवले असून अशोकभाऊ हे याचे सर्वात मोठे प्रतीक आहे. मोठे भाऊंच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या सावलीतही अशोकभाऊरूपी वटवृक्षदेखील बहरला असल्याचे आपल्याला दिसून येते.

३) ग्लोकल संतुलन – भंवरलालभाऊंनी सातत्याने जागतिक पातळीवरील विचार केला असला तरी, यासाठी त्यांनी स्थानिक गुणवत्तेचा वापर केला. जैन उद्योग समूहाची वाटचाल याचमुळे गतीमान झाली. अशोकभाऊंनी याला अजून पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. आज हा उद्योग समूह खर्‍या अर्थाने ग्लोकल अर्थात ग्लोबल व लोकल यांच्यात संतुलन राखत आगेकूच करत आहे.

४) ब्रेन गेन– जळगाव जिल्ह्यातील संधीची वानवा पाहता येथील गुणवत्ता ही बाहेर जात असल्याबद्द नेहमी चिंता व्यक्त केली जाते. अर्थात, ब्रेन ड्रेनला ब्रेन गेनच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम जैन उद्योग समूहाने सातत्याने केले आहे. अशोकभाऊ जैन यांनी याला गती दिली आहे.

५) गुणग्राहकता – निव्वळ व्यावसायिक पातळीवरील ब्रेन गेनलाच अशोकभाऊ जैन यांनी प्राधान्य दिलेले नाही. तर विविध क्षेत्रांमधील प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात त्यांनी कोणताही कंजुषी केलेली नाही. खरं तर, गुणग्राहकता ही अलीकडच्या काळात दुर्मीळ होत चाललेली बाब त्यांच्या आजवरच्या वाटचालीत केंद्रस्थानी असल्याचे आपल्याला दिसून येते.

६) वैविध्य– कोणताही यशस्वी उद्योग समूह हा जाणीवपूर्वक आपल्या उत्पादनांमध्ये डायव्हर्सीफिकेशन अर्थात वैविध्यांचा समावेश करत असतो. यानुसार, जैन गु्रपनेही वैविध्याला प्राधान्य दिले असून अशोकभाऊंच्या नेतृत्वाच्या कालखंडात याला गती मिळाल्याचे दिसून येत आहे. विशेष करून अलीकडेच या समूहाने मसाल्यांच्या क्षेत्रात केलेले पदार्पण हे या दृष्टीने लक्षणीय असेच आहे. जैन ग्रुपच्या वाटचालीत डायव्हर्सीफिकेशनला केंद्रस्थान असल्याचे आपण लक्षात घेत याचा कित्ता गिरवण्याची आवश्यकता आहे.

७ ) कुटुंबवत्सलपणा– व्यावसायिक पातळीवर प्रचंड गतीने यशाच्या पायर्‍या चढत असतांना अशोकभाऊ जैन यांच्यातील कुटुंबवत्सलपणा हा कधी लपून राहिलेला नाही. त्यांनी याला लपविण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. यामुळे हजारो कर्मचार्‍यांचे कार्पोरेट प्रमुख असतांना एका मोठ्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून असणार्‍या भूमिकेतही ते तितक्याच सहजतेने वावरतात.

८ ) मुळांप्रती कृतज्ञता– कुणीही आकाशात कितीही भरारी घेतली तरी आपली पाळेमुळे विसरता कामा नये असे नेहमी म्हटले जाते. याचे सर्वात मोठे उदाहरण जैन समूह आहे. खरं तर बहुराष्ट्रीय कंपनी असल्यामुळे जैनचे मुख्यालय हे मुंबईसारख्या महानगरात हलविणे हे केव्हाही सोयीचे ठरू शकते. मात्र, असे न करता या समूहाचे मुख्यालय जळगावात असणे ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या मूळांप्रती असणारी कृतज्ञता ही लोकविलक्षण अशीच आहे.

याच्या जोडीला खिलाडूवृत्ती, कलासक्तपणा व सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक ऋणातून उतराई होण्याचे सातत्याने केलेले प्रयत्न हेदेखील अशोकभाऊ जैन यांच्या व्यक्तीमत्वातील प्रेरणादायी पैलू आहेत. अशा या महनीय व्यक्तीमत्वाला दीर्घायू लाभो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!