
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशावरून अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे हॉकर्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता गाड्या जप्त केल्याचा आरोप करत बाधित विक्रेत्यांनी आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याची कैफियत प्रसारमाध्यमांसमोर मांडली असून प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने स्टेडियम परिसरातील फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अचानक कारवाई करत त्यांच्या गाड्या आणि साहित्य जप्त केले. या कारवाईदरम्यान तयार करून ठेवलेले अन्न वाया गेले असून, व्यवसायासाठी गुंतवलेले भांडवलही बुडाल्याने विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. रोजच्या प्रमाणे व्यवसाय सुरू करण्यासाठी सकाळपासूनच तयारी केलेली असताना अचानक कारवाई झाल्याने ग्राहकांसाठी तयार केलेले सर्व खाद्यपदार्थ वाया गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
“आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली. यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,” असा आक्रोश विक्रेत्यांनी व्यक्त केला. आधीच महागाईच्या झळा सहन करत व्यवसाय करणे कठीण झाले असताना, या कारवाईमुळे उपजीविकेचा प्रश्न अधिक गंभीर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
अवैध मार्ग न स्वीकारता प्रामाणिकपणे कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे स्पष्ट करत विक्रेत्यांनी प्रशासनाला मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची विनंती केली आहे. “आमच्याकडे दुसरा कोणताही उत्पन्नाचा मार्ग नाही. आम्ही फक्त मेहनतीवर जगतो,” अशी भावनिक प्रतिक्रिया काही विक्रेत्यांनी व्यक्त केली.
शहराच्या सुशोभीकरणाला आणि नियमबद्धतेला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, परंतु उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन महापौर दीपमाला काळे आणि महापालिका प्रशासनाने योग्य तो पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी आर्त मागणी बाधित हॉकर्सनी केली आहे. तसेच, पुढील कारवाईपूर्वी पूर्वसूचना देण्याची आणि पुनर्वसनासाठी निश्चित जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.



