अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी नगरपरिषद प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करत येत्या दोन ते चार दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पालिकेवर जनमोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. ३१ जुलैच्या पुरात केवळ दोन ते तीन पाईप वाहून गेल्याचा दावा करत, ते तात्पुरते जोडून नागरिकांना तत्काळ दिलासा देता आला असता; मात्र कामात विलंब झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका मांडताना ठाकूर यांनी सांगितले की, अमळनेर शहरात २७ ते २८ जुलैदरम्यान काही भागात पाणीपुरवठा झाल्यानंतर त्यानंतर परिस्थिती गंभीर झाली. २० ऑगस्ट उजाडला तरी अनेक नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा दावा त्यांनी केला. पालिका प्रशासन आणि पदाधिकारी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून ‘काम युद्धपातळीवर सुरू आहे’, असे दाखवत असल्याची टीका त्यांनी केली.

पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पुरेशा मनुष्यबळाचा वापर करण्यात आला नसल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला. जर काम खरोखरच युद्धपातळीवर करायचे होते, तर २५ ते ३० मजुरांऐवजी १०० मजूर लावून दिवस-रात्र काम करून काही दिवसांत पाईपलाईन जोडता आली असती, असा दावा त्यांनी केला. नागरिकांच्या पैशांवर चालणाऱ्या नगरपरिषदेला अतिरिक्त मनुष्यबळ लावून काम जलदगतीने पूर्ण करण्याचे गांभीर्य का वाटले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाबरोबरच पाणीवाटपाच्या पद्धतीवरही ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे. बायपास लाईनवरून शहरात सुरू असलेल्या पाणीवाटपात काही भागांना दररोज सुमारे १५ मिनिटे पाणी मिळत असल्याचा, तर अनेक भागांमध्ये गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाणी आले नसल्याचा दावा त्यांनी केला. शहरातील सर्व नागरिकांना समान पद्धतीने पाणी मिळणे आवश्यक असताना काही भागांमध्ये वारंवार पाणीपुरवठा आणि इतर भागांमध्ये दीर्घ प्रतीक्षा का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पाईपलाईन दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही शहरातील सर्व भागांना पाणी पोहोचण्यास मोठा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त करत ठाकूर यांनी प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित केले. काही भागांना २२ दिवस, काहींना २५ ते २८ दिवस, तर काही भागांना महिनाभरानंतर पाणी मिळण्याची वेळ येणार असेल, तर त्याचे नियोजन आणि पर्यायी व्यवस्था पालिकेने स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी नगरपरिषदेकडून टँकरची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला. शहराला पाणीपुरवठा करणे ही नगरपरिषदेची मूलभूत जबाबदारी असल्याचे सांगत, नागरिकांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने टँकर अधिग्रहीत करायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले. पालिकेच्या पर्यायी व्यवस्थेअभावी ‘जयनील फाउंडेशन’सारख्या संस्थांना स्वतःच्या खर्चाने टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे सांगत त्यांनी या सामाजिक संस्थेचे आभार मानले.
पाणीपट्टी वसुलीच्या मुद्द्यावरही ठाकूर यांनी प्रशासनाला लक्ष्य केले. दरवर्षी नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते; मात्र हक्काचा नियमित पाणीपुरवठा करण्यात पालिका अपयशी ठरली असल्याचा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत अमळनेरकरांना पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी पाणीपट्टी भरू नये, असे आवाहन त्यांनी केले. पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेचे पथक आल्यास आधी नागरिकांना पाणी का मिळत नाही, याचा जाब विचारावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाणीप्रश्नावर आपली भूमिका राजकीय नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. पाण्याच्या गंभीर समस्येवर विरोधकही प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचा दावा त्यांनी केला. अमळनेरची जनता संयमी आणि सहनशील आहे; मात्र या संयमाचा अर्थ दुबळेपणा असा घेऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांकडून सातत्याने फोन येत असल्याने हा प्रश्न प्रशासनासमोर मांडावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन ते चार दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषदेवर जनमोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ठाकूर यांनी दिला. त्यामुळे पुढील काही दिवसांत पालिका प्रशासन पाणीप्रश्नावर कोणती ठोस पावले उचलते, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर श्रेयवाद आणि फोटोसेशनला सुरुवात होण्याची शक्यताही ठाकूर यांनी व्यक्त केली. अनेक दिवस नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना प्रत्यक्ष कामाचा वेग वाढवण्याऐवजी काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन, फोटो आणि सोशल मीडिया प्रसिद्धीची चढाओढ होऊ नये, अशी टीका त्यांनी केली. “जनतेला पाणी हवे आहे, उद्घाटनाचा सोहळा नाही. नागरिकांची तहान भागवणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. त्यासाठी फोटोसेशन करून उपकार केल्याचा आव आणण्याची गरज नाही,” असा टोला ठाकूर यांनी लगावला. आता प्रशासनाने सोशल मीडिया प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याला प्राधान्य देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



