


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात महापालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवरून आता राजकारण तापू लागले आहे. सणासुदीच्या काळात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवर, फेरीवाल्यांवर आणि हातगाडीधारकांवर महापालिकेकडून केली जाणारी कारवाई तात्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सविस्तर निवेदन देऊन, लहान व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय न मारता त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.
मनसेने निवेदनात नमूद केले आहे की, शहराच्या सुशोभीकरण व नियोजनासाठी अतिक्रमणांवर कारवाई करणे आवश्यक असले, तरी अतिक्रमणाच्या नावाखाली कष्टाने उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य माणसालाच लक्ष्य करणे चुकीचे आहे. सध्या गणेशोत्सव, नवरात्र आणि आगामी सणांचा काळ असून अनेक लहान व्यावसायिक, आईस्क्रीम गाड्या, पाणीपुरी विक्रेते, भाजी-फळ विक्रेते, चहा-नाश्ता व पूजेचे साहित्य विकणारे व्यापारी वर्षभराच्या तुटपुंज्या कमाईची भरपाई या काळात करत असतात. अशा वेळी महापालिकेने अचानक कारवाई केल्यास या गरिबांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो, असा इशारा मनसेने दिला आहे.
या वेळी मनसेने महापालिकेच्या दुहेरी धोरणावर थेट सवाल उपस्थित केले आहेत. आईस्क्रीम, पाणीपुरी, भाजी व फळांच्या हातगाड्या महापालिकेला अतिक्रमण म्हणून दिसतात, मग मोठ्या व्यापाऱ्यांनी पदपथांवर आणि सार्वजनिक रस्त्यांवर केलेले कायमस्वरूपी ताबे महापालिकेला का दिसत नाहीत, असा थेट प्रश्न मनसेने विचारला आहे. कायदा सर्वांसाठी समान असावा आणि मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून केवळ लहान घटकांना बळी देण्याची ही भूमिका मनसे कधीही खपवून घेणार नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेने महापालिकेकडे प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. सणांच्या काळात लहान व्यापाऱ्यांवरील कारवाई तात्काळ थांबवून त्यांना सुरक्षित व वाहतुकीला अडथळा न ठरणारी पर्यायी जागा द्यावी, शहरातील मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांची निष्पक्ष तपासणी करून समान कारवाई करावी, तसेच शहरात सर्वेक्षण करून कायमस्वरूपी ‘फेरीवाला क्षेत्र’ (Hawkers Zone) घोषित करावे. जर महापालिकेने केवळ गरिबांच्या रोजगारावरच गदा आणण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या अतिक्रमणांवर डोळेझाक केली, तर मनसे या दुहेरी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, प्रकाश जोशी, चेतन पवार, ललीत शर्मा, आशुतोष जाधव, राजेंद्र निकम, मनसे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, तसेच राजेश मराठे आणि खुशाल ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



