


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकात्मता आणि जनजागृतीचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. याच सामाजिक जाणिवेला अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने रोटरी एनक्लेव्ह जळगाव आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसहभागातून गणेशोत्सव’ या महत्त्वपूर्ण विषयावर एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र आज, शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता मायादेवी नगर येथील रोटरी हॉलमध्ये पार पडणार आहे.
या विशेष परिसंवादात प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे, मनपा आयुक्त श्री. आदित्य जिवने, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, रोटरी प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, रोटरी एनक्लेव्हचे प्रेसिडेंट श्री. दिलीप गांधी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री. सचिन नारळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक नेतृत्वाच्या एकत्र येण्यामुळे उत्सवाचे नियोजन अधिक सुटसुटीत आणि लोकभिमुख होण्यास मदत होणार आहे.
सदर उपक्रमाला ‘रोटरी क्लब जळगांव मिडटाऊन’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ सेंट्रल’ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या परिसंवादात प्रामुख्याने गणेशोत्सवात नागरिकांचा सकारात्मक व शिस्तबद्ध सहभाग वाढवणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आणि उत्सवाच्या काळात विविध सामाजिक उपक्रमांची आखणी करणे या मुद्द्यांवर सविस्तर मंथन केले जाईल. या चर्चासत्राला सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष व सचिव, शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन मनीष पात्रीकर यांनी दिली आहे.



