


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाच दिवसांचा आठवडा लागू करावा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील दीडशेहून अधिक राष्ट्रीयीकृत बँकांनी आजपासून देशव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाचा तीव्र परिणाम जळगाव शहरातही पाहायला मिळाला. जळगावातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर सर्व बँक कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली आणि आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
आज शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या या एकदिवसीय देशव्यापी संपामुळे बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, आजचा संप झाल्यानंतर उद्या महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे. त्यानंतर सोमवारी गणेश चतुर्थीचा सण असल्याने सलग चार दिवस बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे. यामुळे ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली असून, एटीएम सेवा आणि ऑनलाईन व्यवहारांवर ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मते, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या ५ दिवसांच्या आठवड्याची मागणी प्रशासनाकडून दुर्लक्षित केली जात आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर वाढता कामाचा ताण लक्षात घेता ही मागणी तात्काळ मान्य करण्याची गरज आहे. याशिवाय वेतन सुधारणा आणि इतर कर्मचाऱ्यांच्या हिताच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही बँक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.



