Home क्राईम भरधाव आयशरच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू ! परिसरावर शोककळा

भरधाव आयशरच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू ! परिसरावर शोककळा

0
229

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दुई गावातील दूध डेअरी जवळ भरधाव वेगात आयशर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या दोन महिलांना जोरात धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरावर शोककळा पसरलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास दुई गावातील दूध डेअरीजवळ ही घटना घडली. सुकडीकडून पूर्णाडकडे जाणाऱ्या एका भरधाव आयशरच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता, कडेने चालणाऱ्या छायाबाई मोतीराम पाटील (वय ४२) आणि शोभाबाई कडू पाटील (वय ४८) यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर मदत करण्याऐवजी चालकाने वाहनासह तिथून पळ काढला.

अपघाताची माहिती मिळताच दुईचे माजी सरपंच संदीप जावळे, रामलाल भिल, अनिल पाटील यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ एका खाजगी गाडीतून दोन्ही जखमी महिलांना मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, मुक्ताईनगर येथे उपचार सुरू असताना छायाबाई पाटील यांची प्राणज्योत मालवली. तर, शोभाबाई पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले होते. दुर्दैवाने, जळगाव येथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही महिलांचे पती शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. छायाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तर, शोभाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस आता पसार झालेल्या आयशर चालकाचा शोध घेत आहेत.


Protected Content

Play sound