


पारोळा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील पळासखेडे बु. येथे जुन्या भांडणाच्या कारणातून १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयुर दुर्वास पाटील (वय १८) असे मयत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी अंकुश नेहरू पाटील (रा. पळासखेडे बु.) याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पळासखेडे बु. शिवारातील रविंद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ मयुर पाटील हा त्याचा चुलत भाऊ संदिप विष्णू पाटील याच्यासोबत गावाकडे येत होता. याचवेळी मयुर आणि अंकुश पाटील यांच्यात मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला.
वाद सुरू असल्याचे पाहून राजेंद्र ज्ञानेश्वर पाटील, विकास बापू पाटील तसेच मयुरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपानुसार अंकुश पाटील याने पँटच्या डाव्या खिशातून चाकू काढून मयुरच्या पोटात वार केले. या हल्ल्यात मयुर गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
घटनेनंतर आरोपीने चाकू दाखवत उपस्थितांना धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.
दरम्यान, गंभीर जखमी मयुरला राजेंद्र पाटील व विकास पाटील यांनी मोटारसायकलवरून उपचारासाठी कुटीर रुग्णालय, पारोळा येथे आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.मयुर हा किसान कॉलेजमध्ये एफ.वाय.बी.ए.चे शिक्षण घेत होता. तरुण मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे पळासखेडे बु. गावावर शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी मयुरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा रजि. क्र. ३४१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपी अंकुश नेहरू पाटील याचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी तपासाची कार्यवाही सुरू केली असून, या हत्येच्या घटनेमागील नेमके कारण आणि अन्य बाबींचा तपास केला जात आहे.



