Home क्राईम यावल पश्चिम वनक्षेत्रात वृक्षतोड करून अतिक्रमणाचा डाव उधळला ; तिघांना अटक, २१...

यावल पश्चिम वनक्षेत्रात वृक्षतोड करून अतिक्रमणाचा डाव उधळला ; तिघांना अटक, २१ हजारांचा वनमाल जप्त

0
18

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागातील नागादेवी परिसरात अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने जंगलातील वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी यावल पश्चिम वनक्षेत्रातील वनविभागाने कारवाई करत तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. वनविभागाच्या गस्ती पथकाला जंगलात ठिकठिकाणी तोडलेली झाडे आढळून आल्यानंतर तपासाची चक्रे फिरवण्यात आली. या कारवाईत सुमारे १.६९३ घनमीटर वनमालाची नोंद झाली असून, त्याची अंदाजे किंमत २१ हजार ११९ रुपये असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील पश्चिम वनक्षेत्रातील सातपुडा पर्वतातील कक्ष क्रमांक १४ मध्ये हरिपुरा गस्ती पथकासह वनकर्मचारी नियमित गस्त घालत होते. या परिसरात रात्री-अपरात्री अज्ञात व्यक्ती एकत्र येऊन नव्याने अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने जंगलातील झाडे तोडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वनविभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत तोडलेल्या झाडांच्या खुंटांची पाहणी आणि मोजमाप सुरू केले.

तोडलेल्या झाडांच्या खुंटांवर वनविभागाकडून जप्तीचा शिक्का मारण्यात आला असून, लाल रंगाने २४ ते ८५ असे क्रमांक देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक खुंटाचे मोजमाप घेण्यात आले. या मोजमापानुसार एकूण १.६९३ घनमीटर वनमाल असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची अंदाजे किंमत २१ हजार ११९ रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वनविभागाने प्र. रि. क्र. ०३/२०२६ नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान वृक्षतोडीच्या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तीन संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उकार महान बारेला (वय ४३), जगन जया बारेला (वय ३४) आणि चेलारसिंग मोहन बारेला (वय ४४), तिघेही रा. नागादेवी, सावखेडा सीम, ता. यावल, जि. जळगाव, यांचा समावेश आहे. वनविभागाने या तिघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर संबंधित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली. आरोपींना २ सप्टेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सातपुडा पर्वतातील दुर्गम भागात अतिक्रमणाच्या उद्देशाने जंगलातील वृक्षतोड होत असल्याचे प्रकार यापूर्वीही निदर्शनास आले आहेत. त्यामुळे वनक्षेत्रात होणाऱ्या बेकायदा वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाकडून गस्त वाढविण्यात येत आहे. नागादेवी परिसरातील कारवाईमुळे जंगलातील वृक्षतोड करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

ही कारवाई उप वनसंरक्षक सौरीश सहाय, यावल वनविभाग, जळगाव, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील आणि यावल पश्चिम क्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल संजय बी. इंडे, हरिपुरा, वनपाल दीपक परदेशी, जामन्या, तसेच सुधीर पटणे, सीमा भालेराव, सरला भोंगरे, चेतन शेलार, योगेश मुंढे, रणधीर काटे यांच्यासह वनविभागातील इतर वनसेवकांनी सहभाग घेतला. दुर्गम आणि जंगलातील भागात गस्त घालताना आढळून आलेल्या वृक्षतोडीचा तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्यात वनकर्मचाऱ्यांना यश आले.


Protected Content

Play sound