Home पर्यावरण अट्रावलच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वड्री धरणाचे पाणी इंजाळ नदीपात्रात सोडले ; आमदार...

अट्रावलच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वड्री धरणाचे पाणी इंजाळ नदीपात्रात सोडले ; आमदार अमोल जावळेंच्या प्रयत्नांना यश

0
13

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अट्रावल आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. वड्री धरणाचे पाणी इंजाळ नदीपात्रातून अट्रावलपर्यंत पोहोचविण्यासाठी रखडलेले जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले असून, इंजाळ नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. येत्या ८ ते १० दिवसांत हे पाणी अट्रावलपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून, त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींच्या जलपातळीत वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे.

अट्रावलसह डोंगर कठोरा, सांगवी आणि सांगवी खुर्द या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींची जलपातळी वाढावी, यासाठी वड्री धरणाचे पाणी इंजाळ नदीपात्रात सोडण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीचा विचार करून रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी पुढाकार घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, आमदार जावळे यांनी आमदार निधीतून अंदाजे ३५ लाख रुपयांचा निधी पाटबंधारे विभागाकडे वर्ग केला. या निधीतून वड्री धरण ते कठोरा शिवारातील इंजाळ नदीपात्रादरम्यान पूर्वी अपूर्ण राहिलेले जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. या कामासाठी ३६ इंच व्यासाचे NT-4 प्रकारचे पाईप टाकून त्यांची आवश्यक फिटिंग करण्यात आली.

जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर कठोरा येथील ग्रामस्थांनीही काही किरकोळ कामे श्रमदानातून पूर्ण केली. त्यामुळे प्रलंबित कामाला गती मिळून अखेर इंजाळ नदीपात्रात वड्री धरणाचे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. इंजाळ नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने आता हे पाणी अट्रावलपर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा आहे. येत्या ८ ते १० दिवसांत पाणी अट्रावलपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पाणी गावापर्यंत पोहोचल्यास अट्रावलच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या विहिरीची जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

याशिवाय अट्रावल शिवारातील शेतकऱ्यांच्या विहिरींनाही या पाण्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात पाणी उपलब्ध झाल्याने परिसरातील भूजलपातळीत वाढ होऊन शेतीसाठी उपलब्ध पाणीसाठ्याला आधार मिळू शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या दृष्टीनेही हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. अट्रावल ग्रामस्थ गेल्या सुमारे बारा वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे इंजाळ नदीपात्रात वड्री धरणाचे पाणी सोडण्यात आल्याची माहिती समोर येताच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी गावापर्यंत पोहोचल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यासोबतच शेतीसाठीही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल कठोरा, सांगवी, अट्रावल आणि सांगवी खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देत जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. “वड्री धरणाचे पाणी इंजाळ नदीपात्रातून अट्रावलपर्यंत पोहोचल्याने गावाच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आता सोडण्यात आलेले पाणी नियोजित वेळेत अट्रावलपर्यंत पोहोचते का आणि त्याचा विहिरींच्या जलपातळीवर किती परिणाम होतो, याकडे परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound