‘ॲपल वॉच सेरीज नाईन’ची एंट्री : जबरदस्त फिचर्स; जाणून घ्या इत्यंभूत माहिती !

लॉसएंजल्स-वृत्तसंस्था | ॲपल कंपनीने आपल्या आजच्या वार्षिक कार्यक्रमात सेरीज नाईन या मालिकेत स्मार्टवॉच लॉंच केले असून यात अनेकविध सरस फिचर्सचा समावेश आहे.

ॲपलने अनेक दिवसांपासून वंडरलस्ट या नावाने १२ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाची घोषणा केल्याने यात नेमकी कोणती उत्पादने लॉंच करण्यात येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यात प्रामुख्याने आयफोन १५ मालिका, नवीन स्मार्टवॉच मालिका आणि आयओएसच्या नवीन आवृत्तीबाबत अनेक लीक्समधून माहिती समोर आली होती. या अनुषंगाने भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास कार्यक्रमास प्रारंभ झाला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला ॲपलचे सीइओ टिम कुक यांनी नवीन उत्पादनांची माहिती दिली. यानंतर नवीन ॲपल वाच सादर करण्यात आले. ॲपल वॉच हे जगातील सर्वात अद्ययावत असणारे स्मार्टवॉच असून यातील ॲपल वॉच सेरीज नाईन ही या कार्यक्रमात अधिकृतपणे लॉंच करण्यात आली. यात अनेकविध सरस फिचर्सचा समावेश आहे. यात प्रामुख्याने एस९ या प्रोसेसर देण्यात आल्याने हे वॉच अधिक गतीमान असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. यासोबत ॲपलच्या सिरी या व्हॉईस असिस्टंटला हेल्थ विषयक प्रश्‍नावलीसोबत कनेक्ट करण्यात आल्यामुळे युजरला आपल्या आरोग्यविषयक माहितीला अधिक चांगल्या पध्दतीत जाणून घेता येत असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

ॲपल वॉच सेरीज नाईनमध्ये आधीपेक्षा अधिक दर्जेदार बॅटरी प्रदान करण्यात आली असून याच्या मदतीने ३६ तासांपर्यंत हे स्मार्टवॉच वापरता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात ‘डबल टॅप’ हे नाविन्यपूर्ण फिचर प्रदान करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत अंगठा आणि बाजूच्या बोटाच्या मदतीने (अंगठा आणि बोटाची एकमेकावर टिचकी मारून ) कॉल करण्यासह कॉल बंद करता येणार आहे. यात आधीपेक्षा अधिक दर्जेदार डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. ही मालिका ‘कार्बन न्यूट्रल’ या प्रकारातील असल्याने ते पर्यावरणानुकुल असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याशिवाय, या स्मार्टवॉचमध्ये आधीप्रमाणेच सर्व फिचर्स आहेत. हे मॉडेल पाच अतिशय आकर्षक अशा रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले असून जगभरात ते पुढील महिन्यापासून खरेदी करता येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आलेली आहे.

दरम्यान, याच कार्यक्रमात अल्ट्रा २ या नावाने नवीन स्मार्टवॉच या नावाने नवीन वॉच लॉंच करण्यात आलेले आहे. यात अजून काही अद्ययावत फिचर्स प्रदान करण्यात आलेले आहे. यात प्रामुख्याने सेरीज नाईनमध्ये २००० नीटस इतका ब्राईटनेस दिलेला असला तरी नवीन मॉडेलमध्ये ३००० नीटस इतका ब्राईटनेस असणार आहे. अर्थात, याचा डिस्प्ले हा अधिक उत्तम असणार आहे. तर यात सेरीज नाईनमधील अन्य सर्व फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.

Protected Content