भाजपची साथ सोडा…महाआघाडी सोबत या ! : नितीश यांना दिग्वीजय सिंह यांची साद

नवी दिल्ली । नितीश कुमार यांनी संघ-भाजपची साथ सोडून महाआघाडी सोबत येण्याचे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजय सिंह यांनी केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र एनडीएला मिळालेल्या १२५ जागांमध्ये सर्वाधिक ७४ जागा ह्या भाजपाला मिळाल्या आहेत. तर आतापर्यंत बिहार एनडीएमधी मोठा पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडला केवळ ४३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे नितीश कुमार हे अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असली तरी भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याने जेडीयूची वाटचाल खडतर राहण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमिवर, दिग्वीजय सिंह यांनी त्यांना थेट महागठबंधन सोबत येण्याचे आवाहन केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी विविध ट्विटसच्या माध्यमातून दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना भाजपाचा साथ सोडण्याचे आवाहन केले आहे. यातील एका ट्विटमध्ये दिग्विजय सिंह म्हणाले की, भाजपा आणि संघ हे अमरवेलीप्रमाणे आहे. ते ज्या झाडाला विळखा घालतात. ते झाड वाळून जाते. त्यानंतर या वेलीचा त्यावर कब्जा होतो. नितीशजी लालू प्रसाद यादव यांनी तुमच्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनांमध्ये सोबत तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपाच्या विचारधारेला सोडचिठ्ठी देऊन तेजस्वी यांना आशीर्वाद द्या आणि अमरवेलीसारख्या असलेल्या भाजपा आणि संघाला बिहारमध्ये वाढण्यापासून रोखा.

सिंह यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नितीशजी आता तुमच्यासाठी बिहार हे खूप छोटे झाले आहे. आता तुम्ही भारताच्या राष्ट्रीय राजकारणात या. सर्व समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणींवर विश्‍वास ठेवणार्‍या लोकांमध्ये ऐक्य घडवून आणण्यास मदत करा. इंग्रजांनी वाढवलेली फूट पाडा आणि राज्य करा ही संघाने जोपासलेली नीती हाणून पाढण्यासाठी प्रयत्न करा.

पुढील ट्विटमध्ये दिग्वीजय यांनी नितीश कुमारांना त्यांच्या वैचारिक वारश्याची आठवण करून दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति खरी श्रद्धांजली असेल. तुम्हीं त्यांच्याच वारशामधून समोर आलेले नेते आहात. आता तिथेच या. जनता पक्ष संघाच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून फुटला होता. याची मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. भाजपा आणि संघाची साथ सोडा आणि देशाला विनाश होण्यापासून वाचवा, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.

Protected Content