अण्णा हजारेंची शेवटच्या उपोषणाची घोषणा

राळेगणसिध्दी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस दिल्लीत उपोषण करण्याची घोषणा केली असून हे आपले शेवटचे उपोषण असेल असे स्पष्ट केले आहे.

शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले. दिल्लीतील रामलीला मैदान अथवा जंतरमंतर येथे उपोषणाला परवानगी मिळाली नाही तर आपण अटक करवून घेऊ व तुरुंगात उपोषण करू, असा इशारा हजारे यांनी दिला आहे.

अण्णा हजारे यांनी आंदोलन करू नये असा प्रयत्न भाजपने केल्याचे दिसून आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन, अण्णांनी आंदोलन करू नये अशी विनंती केली. मात्र सरकारला आपण दोन वर्षे वेळ दिला. दोन वर्षांत शेतकरी हिताच्या मागण्यांसंदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे हजारे म्हणाले.

उपोषणासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात रामलीला मैदानाची मागणी नवी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. तोपर्यंत शेतकरी हिताचा काही निर्णय झाला तर ठीक, नाही तर जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात नवी दिल्ली येथे उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे हे आपले शेवटचे आंदोलन असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content