युपीएची अवस्था एनजीओसारखी झालीय ! : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । विरोधी पक्ष म्हणजे ओसाड गावची पाटिलकी असल्याचे नमूद करत युपीएची अवस्था सध्या एखाद्या एनजीओसारखी झाली असल्याची टीका आज शिवसेनेने केली आहे. यात महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष असणार्‍या काँग्रेसलाही खडे बोल सुनावण्यात अले आहे. यामुळे आता यावर काँग्रेसकडून जोरदार प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील अग्रलेखात आज विरोधी पक्षांच्या आजच्या अवस्थेबाबत भाष्य करण्यात आलेले आहे. यात म्हटले आहे की, लोकशाहीचे सध्या जे अधःपतन सुरू आहे त्यास भारतीय जनता पक्ष किंवा मोदी-शहांचे एककल्ली सरकार जबाबदार नसून निपचित पडलेला विरोधी पक्ष सर्वाधिक जबाबदार आहे. सद्यस्थितीत सरकारला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. विरोधी पक्षालाही एक सर्वमान्य नेतृत्व असावे लागते. त्याबाबतीत देशातील विरोधी पक्ष संपूर्ण दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभा आहे.

यात पुढे म्हटले आहे की, राहुल गांधींच्या विधानांना काँग्रेसही गांभीर्याने घेत नाही, असे कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले. आपल्या सर्वोच्च नेत्यांची अशी जाहीर चेष्टा करण्याचे धारिष्ट सत्ताधारी का दाखवतात यावर काँग्रेसने वर्किंग कमिटीत चर्चा करणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांची चेष्टा करणार्‍या कृषी मंत्री तोमर यांनाही देशातील शेतकरी गांभीर्याने घेत नाही ही वस्तुस्थिती आहेच. मात्र तरीही सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे, हा आक्षेप उरतोच.

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक यूपीए नामक राजकीय संघटन आहे. त्या यूपीएची अवस्था एखाद्या एनजीओप्रमाणे झाल्याचे दिसत आहे. यूपीएतील घटक पक्षांनीही देशांतर्गत शेतकर्‍यांचा असंतोष फारशा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. यूपीएमध्ये काही पक्ष असावेत. पण ते नक्की कोण व काय करतात, याबाबत संभ्रम आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तर यूपीएतील इतर घटक पक्षांची साधी सळसळही जाणवत नाही. आज वर्षभर काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. अशा वेळी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, यूपीएचे भविष्य काय, हा भ्रम कायम आहे.

यात शेवटी म्हटले आहे की, प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा होते. ममता बॅनर्जींची कोंडी होते, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला काम करू दिले जात नाही. कमलनाथांचे मध्य प्रदेश सरकार स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच पाडल्याचा स्फोट भाजप नेते करतात. हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? मरतुकडया अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष! देशासाठी हे चित्र बरे नाही. काँग्रेस नेतृत्वाने याचा विचार केला नाही तर येणारा काळ सगळयांसाठीच कठीण आहे, अशी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून ३० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल असे या अग्रलेखात म्हटले आहे.

Protected Content