मुंबई प्रतिनिधी । धुळे येथील माजी आमदार अनिल गोटे आज मुंबईतील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून यामुळे भाजपला जोरदार धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.
भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी एप्रिल महिन्यात पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी सातत्याने पक्ष नेतृत्वावर तोफ डागली होती. आजवर त्यांनी पुढील वाटचालीबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. तथापि, ते आज राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. गोटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि खासदार सुभाष भामरे यांच्या विरोधात अनेकदा उघड भूमिका घेतली आहे. धुळे महापालिका निवडणुकीत वाद विकोपाला गेल्यानंतर अनिल गोटे यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा तर आमदारकीचा राजीनामा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवला होता. महापालिकेतही गोटे यांना यश मिळाले नव्हते. तर अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले होते. या पार्श्वभूमिवर, ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने याचा भाजपला धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.