Home Cities जळगाव मोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीतून रेश्मा काळे यांची जाहीर माघार, नंदकिशोर महाजनांना...

मोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीतून रेश्मा काळे यांची जाहीर माघार, नंदकिशोर महाजनांना पाठींबा !

0
17

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला असून आज शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांनी भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. नाशिक येथील नाट्यमय घटनेचे पडसाद या माध्यमातून जळगावमध्ये उमटले आहेत. आणि याची घोषणा मुंबईत झाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेत प्रचंड वाद झाले. पहिल्या टप्प्यात शिवसेनेने या जागेवर दावा दाखल केला. यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले. तर, लागलीच पाचोऱ्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी यांचे पुत्र सुमीत पाटील यांचे नाव देखील दावेदार म्हणून समोर आले. महायुतीत जळगावची जागा नेमकी कुणाच्या वाट्याला येणार ? याबाबत मोठा काथ्याकुट झाला. शेवटी ही जागा भाजपला सुटून या पक्षाच्या वतीने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही मिनिटे बाकी असतांना जळगावच्या शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरल्याने खळबळ उडाली. माघार घेण्याची मुदत उलटून गेल्यानंतर देखील त्यांनी आपला अर्ज मागे न घेतल्याने जळगावची लढत बहुरंगी झाली. यात महायुतीचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे शरद तायडे, अपक्ष अनिल चौधरी आणि अपक्ष रेश्मा काळे असा सामना रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले. दरम्यान, जळगावमधील राजकीय पेच हा नाशिकशी जुडलेला असल्याने एका ठिकाणचा निर्णय हा दोन्ही ठिकाणी चित्र बदलणार असल्याचे संकेत मिळाले होते. आणि झाले देखील तसेच !

नाशिक येथे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर गोकुळ गिते यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना समजवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर दिल्लीवरून आलेल्या आदेशानंतर गिते यांनी दराडे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेत याबाबतची माहिती दोन दिवसांपूर्वी जाहीर केली. यानंतर जळगाव येथील शिवसेनेच्या बंडखोर अपक्ष उमेदवार रेश्मा काळे यांची देखील निवडणुकीतून माघार होणार असल्याचे संकेत मिळाले होते. यातच जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी रेश्मा काळे यांची माघार निश्चीत असून केवळ याची औपचारिकता बाकी असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितल्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले होते.

यानंतर शुक्रवारी ना. गिरीशभाऊ महाजन हे जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी देखील तेथे दाखल झाले. यात भाजपचे ना. संजय सावकारे, खा. स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील, माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजपचे जिल्हाप्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि उमेदवार नंदकिशोर महाजन यांची उपस्थिती होती. या सर्वांनी बैठक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन यात झालेल्या निर्णयाची माहिती दिली.  यात गिरीशभाऊ महाजन आणि आ. किशोरआप्पा पाटील यांनी रेश्मा काळे या शनिवारी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर माघारीची घोषणा करतील असे जाहीर केले.

तर दुसरीकडे मात्र वेगळ्याच घडामोडी घडल्या. बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या आपले पती कुंदन काळे आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरीता माळी-कोल्हे यांच्या सह थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटल्या. तिथे उपमुख्यमंत्र्यासोबत चर्चा झाल्यानंतर रेश्मा काळे यांनी माघारीचा निर्णय घेतला. आणि यानंतर रात्री उशीरा टिव्ही नाईन या वाहिनीशी बोलतांना त्यांनी आपण विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठींबा देत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. यामुळे आता जळगावमधील तिढा खऱ्या अर्थाने सुटल्याचे दिसून येत आहे.

यामुळे आता विधानपरिषदेच्या उमेदवारी अर्ज माघारीची मदत उलटून गेली असली तरी रेश्मा काळे यांनी जाहीर माघार घेतल्याने त्या तांत्रीकदृष्टया निवडणुकीच्या रिंगणात उरल्या तरी त्यांची ताकद आता नंदकिशोर महाजन यांच्या मागे राहणार आहे. याचमुळे विधानपरिषदेचा मुकाबला आता महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरद तायडे विरूध्द अपक्ष अनिल चौधरी असा तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound