अंगणातील सांडपाण्याच्या कारणावरून वृद्धावर लोखंडी सुराने वार

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील बहाड गावात घरासमोर सांडपाण्याच्या कारणावरून वृद्धाला शिवीगाळ व मारहाण करून लोखंडी सुऱ्याने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना सोमवार १३ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिमन सुकलाल शेवरे वय-६५, रा. बहाळ ता. चाळीसगाव हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी १३ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता अंगणात सांडपाणी टाकल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे सुरेश मंगल भोई व त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांनी अभिमन शेवरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मासे कापायचा लोखंडी सुरा डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. दरम्यान जखमी झालेल्या अभिमन शेवरे यांना तातडीने मेहुणबारे ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता संशयित आरोपी सुरेश मंगा भोई, दीपक सुरेश भोई, कैलास भिकन भोई, रमेश मंगा भोई, गिरीश रमेश भोई, अक्षय रमेश भोई, उषाबाई रमेश भोई, मायाबाई सुरेश भोई आणि संगीताबाई बाबुलाल भोई सर्व रा. बहाळ ता. चाळीसगाव यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे हे करीत आहे.

Protected Content