पोलिसांचा खबऱ्या समजून तरुणाला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी। पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून तीन जणांनी रेल्वे स्थानकाबाहेर पार्कींगमध्ये काम करणाऱ्या तरुणास लोखंडी रॉडने मारहाण केली होती. एवढेच नव्हे तर, त्याच्या खिशातील दीड हजार रुपये जबरीने लुटून नेले होते. पोलिसांनी रात्रीतून तपासचक्र फिरवीत तिघं संशयित आरोपींना अटक केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, रेल्वे स्थानकाच्या पार्कींगमध्ये अल्तमश खान अय्युब खान (वय २७, रा.गेंदालाल मिल) हा काम करतो. रविवारी रात्री ११.३० वाजता नरेश विश्वकर्मा (रा.शिवाजीनगर), किरण मोरे व अजय सोनवणे (दोघे रा.गेंदालाल मिल) हे तिघं रिक्षा क्र. (एमएच १९ व्ही ६९३७) तेथे आले. त्यानंतर अल्तमश हा पोलिसांच्या खबऱ्या असल्याचा आरोप करीत तिघांनी त्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. एवढेच नव्हे तर, त्याच्या खिशातील दीड हजार रुपये काढल्यानंतर घटनास्थावरून पळ काढला होता.

दरम्यान, मारहाण झाल्यानंतर अल्तमश याला त्याचा मित्र विकास जाधव याने शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर अल्तमशच्या फिर्यादीवरून मारहाण व जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी रात्रीतून तपासचक्र फिरवायला सुरुवात केली. त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक जगदीश मोरे, वासुदेव सोनवणे, रतन गिते, गणेश शिरसाळे, तेजस मराठे यांच्या पथकाने तिघं संशयितांना अटक केली.

Protected Content