जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आज उदय आणि स्मिता वाघ यांची भेट घेऊन गुफ्तगू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भाजपने ऐन वेळेस आमदार स्मिता वाघ यांचा पत्ता कट करून आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट दिल्यामुळे भाजपमध्ये उघड कलह निर्माण झाला आहे. उदय वाघ यांनी तर हा आपला कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याची टोकाची प्रतिक्रिया दिली होती. तर स्मिता वाघ यांनीही नाराजी व्यक्त केली होती. वाघ समर्थकांचा उद्रेकदेखील दिसून आला होता. मात्र यानंतर स्मिता वाघ यांनी उमदेपणा दाखवत उन्मेष पाटील अर्ज भरत असतांना हजेरी लावली. यानंतर आज उन्मेष पाटील यांचा प्रचार सुरू झाला तरी याच्या प्रारंभी व प्रचार फेर्यांमध्ये वाघ दाम्पत्याची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. यानंतर दुपारी गुलाबराव देवकर आणि उदय वाघ व आमदार स्मिता वाघ यांच्यात बंदद्वार बैठक झाली. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी लोकसभा निवडणुकीबाबत यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार स्मिता वाघ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे समर्थक हे निवडणुकी नेमका काय पवित्रा घेणार हे आजच सांगता येणार नाही. मात्र अनेकांनी उघडपणे भाजप आणि भाजपच्या उमेदवाराला धडा शिकवण्याचे इशारे दिले आहेत. या पार्श्वभूमिवर, आजच्या बैठकीला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. गुलाबराव देवकर यांना नेहमीच बेरजेचे राजकारण लाभदायक राहिले आहे. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील गृहकलहाचा त्यांना लाभ होणार का ? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्वण सुरू झाले आहे.