कैद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्यास पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । कारागृहातून तीन कैद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या जगदीश पुंडलिक पाटील (वय-१८, रा. पिंपळकोठा ता.पारोळा) याला एलसीबीने अटक केली होती. आज न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात २५ जुलै रोजी गेट किपर म्हणून ड्युटीला असलेल्या कारागृह रक्षकाच्या डोक्याला गावठी पिस्तुल लावून सुशील अशोक मगरे (वय-३२, रा.कसबे पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील (वय-२१, रा.तांबापुरा, अमळनेर) व सागर संजय पाटील (वय-२२, रा. पैलाड,अमळनेर) या तीन न्यायालयीन कैदींनी कारागृहातून फिल्मीस्टाईल पलायन केल्याची घटना घडली होती. या तिघांना घेण्यासाठी बाहेर जगदीश पाटील हा दुचाकीवर थांबलेला होता. त्याच्यासोबत एकाच दुचाकीवर हे चौघे जण पळून गेले होते. दरम्यान या तिन्ही कैद्यांना पळविण्यास मदत करणारा संशयित आरोपी जगदीश पाटील हा रविवारी रात्री पारोळा येथून सुरतला जाण्यासाठी एका ट्रॅव्हल्स बसमध्ये बसला होता. ही माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यानंतर त्यांनी धुळे, साक्री येथील पोलिसांशी संपर्क साधून संशयित आरोपी धुळे साक्री रोडवर जगदीश याला ताब्यात घेण्यात आले.

सहा दिवस पोलीस कोठडी
संशयित आरोपी जगदीश पाटील याला आज न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.

Protected Content