…हा तर अंनिसच्या संघर्षाचा विजय !

जळगाव, प्रतिनिधी । गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने यंदा उत्तम नियोजन केल्याचे दिसत आहे. या नियोजनानुसार, शहरातील विविध प्रभागात मूर्ती संकलन केंद्र उभारणार असल्याचे आयुक्त व पोलिस अधीक्षक यांनी सांगितले आहे. हा अंनिसच्या “विसर्जित मूर्ती दान करा” या उपक्रमाशी जुळणारा उपक्रम असून जिल्हा, मनपा व पोलीस प्रशासनाने यंदा हा उपक्रम करून दाखवावा असे आव्हान महाराष्ट्र अंनिसने दिले आहे.

दरवर्षी गणेश विसर्जनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रात जलप्रदूषण टाळण्यासाठी विसर्जित मूर्ती दान करा हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राबवित असते. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कृत्रिम तलाव उभारण्याचेही नियोजन आता जिल्हा प्रशासन करत असते.

यंदा करोनामुळे का होईना प्रशासन गर्दी टाळण्यासाठी आता प्रभागांत मूर्ती संकलन केंद्र उभारणार आहे. हा अंनिसच्या उपक्रमाशी जुळता निर्णय असून मुर्त्या दान मिळण्यासाठी करीत असलेल्या संघर्षाचा विजय आहे. संकलित झालेल्या मूर्ती ह्या कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात अशी अंनिसची मागणी आहे. यामुळे मेहरुण तलाव, गिरणा नदी तसेच जिल्ह्यातील अन्य पाण्याचे स्रोत प्रदूषित होणार नाहीत. धर्माची कालसुसंगत चिकित्सा करावी या समाजसुधारकांनी सांगितलेल्या मार्गावरच आता कालांतराने प्रशासनाची भूमिका व नियोजन आले आहे.

अंनिस ही दृष्टिकोन देणारी चळवळ आहे. जेव्हा कार्यकर्ते मूर्ती दान, निर्माल्य दान करा असे आवाहन करीत होते त्यावेळी कार्यकर्त्यांना खूपच संघर्ष करावा लागला होता. आता मात्र शासनाने याबाबत दखल घेतली त्याबद्दल शासन, प्रशासन यांचे अंनिसने आभार मानले आहे.

त्याचबरोबर पाण्यात जाऊन बुडून होणारे मृत्यूदेखील टळणार आहे. जिल्हा प्रशासनाने, संकलित मुर्त्या कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात, निर्माल्य संकलनाला पुरेशा कलशकुंडी उपलब्ध कराव्यात, मूर्त्यांची उंची 4 फूट असल्याने त्या कृत्रिम तलावातच विसर्जीत करण्याचे मंडळांना आवाहन करावे आशा मागण्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे, आर.वाय.चौधरी, सुनील वाघमोडे, मोहन मेढे आणि जिल्ह्यातील शाखांनी केले आहे.

Protected Content