अपहार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांनी कारावास

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बहादरपूर येथील तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेत झालेल्या अपहार प्रकरणी अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने सचिवाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा तब्बल ३० वर्षांनी निकाल लागलाय हे विशेष !

या संदर्भातील वृत्त असे की, बहादरपूर येथील तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेत भोलाणे तांडा येथील चरणसिंग गोविंदा जाधव हे चेअरमन तर राजेंद्र हरिश्चंद्र वाणी हे सचिव होते. सन १९८८ ते १९९२च्या कालावधीत झालेल्या लेखा परीक्षणात चेअरमन आणि सचिवांनी २० हजार रुपयांचा अपहार करून यासोबत स्टॉक रजिस्टर प्रमाणे विविध प्रकारचे खते, बियाणे साठा शिल्लक असताना १४ हजार ८८२ रुपयांच्या मालाची परस्पर विल्हेवाट लावलेली दिसून आली होती.

या अनुषंगाने, अप्पर लेखा परीक्षक शांताराम नथ्थू पाटील यांनी पारोळा पोलिसांत सन १९९३मध्ये ३४ हजार ८८२ रुपयांचा अपहारप्रकरणी चरणसिंग जाधव व राजेंद्र वाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी प्रदीर्घ काळ सुनावणी झाली. यानंतर शुक्रवारी न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी संस्थेचे तत्कालीन सचिव राजेंद्र वाणी यांना सहा महिन्यांचा सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा शिक्षा सुनावली आहे. अर्थात, ३४ हजारांच्या अपहार प्रकरणी सुमारे ३० वर्षांनी त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Protected Content