नीरज चोप्राला रौप्य पदक : विक्रमी कामगिरी !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऑलिंपीकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर नीरज चोप्रा याने जागतिक ऍथलेटीक स्पर्धेत रजत पदक जिंकून विक्रमी कामगिरी केली आहे.

जागतिक ऍथलेटीक स्पर्धेत नीरज चोप्रा याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होता. यात त्याला यश मिळाले नसले तरी त्याने रजत पदक पटकावून आपल्या कामगिरीची छाप उमटवली. आज त्याची सुरुवात निराशाजनक झाली. फायनलमध्ये नीरजचा पहिला थ्रो फाऊल ठरला. दुसर्‍या थ्रोमध्ये त्याने ८२.३९ मीटर तर तिसर्‍या प्रयत्नात ८६.३७ मीटर भाला फेकत त्याने आव्हान कायम ठेवले तर, नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर ८८.१३ मीटर्सवर भाला फेकला. यामुळेच त्याला रजत पदक मिळाले. ग्रेनेडाचा अँडरसन वन पीटर्सनं सुवर्णपदक जिंकलं आहे. त्यानं पहिल्या प्रयत्नात ९०.२१ मीटर तर दुसर्‍या प्रयत्नात ९०.४६ मीटर भाला फेकला.
जागतिक ऍथलेटीक स्पर्धेत आजवर भारताला फक्त एक कांस्यपदक मिळाले आहे. २००३ साली अंजू बॉबी जॉर्ज हिने लांब उडीत ही कामगिरी केली होती. यानंतर १९ वर्षांनी नीरजने यापुढचा टप्पा गाठत देशाला रजत पदक मिळवून दिले आहे.

Protected Content