५० टक्के प्रभावी ठरणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी दिली जाऊ शकते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता कोरोनावरील लसीवर सर्वांचं लक्ष लागून आहे. देशात लस विकसित करण्यावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. परंतु कोणत्या लसीला परवानगी देण्यात येईल याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (आयसीएमआर) महत्त्वाची माहिती दिली आहे. श्वसनाचा विकार असलेल्यांवर कोणतीही लस १०० टक्के प्रभावी ठरेल अशी विकसित झालेली नाही. ५० ते १०० टक्के प्रभावी ठरणाऱ्या करोनाच्या लसीच्या वापराला मंजुरी दिली जाऊ शकते, असं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं. सेंट्रल ड्रग्‍स अँड स्‍टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइझेशनच्या ड्राफ्ट गाईडलाईन्सच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“श्वसनाच्या आजाराशी निगडीत कोणतीही लस १०० टक्के प्रभावी नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कोणत्याही लसीमध्ये सुरक्षा, इम्युनोजेनिसिटी आणि कार्यक्षमता आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ५० टक्के कार्यक्षमता असलेल्या लसीलाही मंजुरी देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. आमचं लक्ष्य १०० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचं आहे. परंतु त्याची कार्यक्रमता ५० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान असेल,” असं डॉ.भार्गव म्हणाले.

ऑक्सफर्डच्या लसीच्या सुरूवातीच्या चाचण्यांमध्ये उत्तम निरिक्षणं नोंदवण्यात आली आहेत. लस इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर करण्यात यशस्वी ठरली आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार भारतात तयार झालेली लस ही अधिक प्रभावी ठरणार आहे. त्याचं कम्पोझिशन सुलभ असून सुरक्षिततेकडेही लक्ष देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

त्या लसींना मान्यता देण्यात येईल ज्या लसी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात ५० टक्के लोकांवर प्रभावी ठरतील, भारतात सध्या तीन लसींची मानवी चाचणी सुरू आहे. रशियामध्ये परवागी देण्यात आलेल्या स्पुटनिक-व्ही या लसीच्या मानवी चाचणीलाही भारतात परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सध्या देशात सीरम इंन्स्टिट्यूटच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि झायडस कँडिला या कंपनीच्या लसीचीही मानवी चाचणी सुरू आहे.

Protected Content